मुंबईकरांच्या प्रवासातील अडचणी संपाव्यात या साठी प्रशासनाकडून सातत्याने प्रकल्प राबवले जात आहेत. अलीकडेच मुंबईकरांच्या सेवेत भुयारी मेट्रो दाखल झाली आहे. पश्चिम उपनगरातील आरे ते दक्षिण मुंबईतील कफ परेड हा दोन टोक आता अगदी सव्वा तासांत गाठता येतात. भुयारी मेट्रोमुळं मात्र बेस्ट बसवर परिणाम झाला आहे. बेस्ट उपक्रमाने आपल्या मार्गात बदल केले आहेत.
अपुरा बसचा ताफा, प्रवाशांची मागणी आणि शहरातील अनेक ठिकाणांवरील वाहतूक बदल या सगळ्या पार्श्वभूमीवर बेस्ट उपक्रमाने आपल्या बस मार्गात मोठे फेरबदल केले आहेत. आज शनिवारपासून 23 पुनर्रचित मार्गावर बस धावणार असून, आठ मार्गावरील बसचे एसी बसमध्येही रूपांतर केले शिवाय, वर्ल्ड ट्रेड सेंटर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) हा ए-207 बस क्रमांकाचा नवीन बसमार्गही सुरू होत आहे.
सध्या बेस्टच्या स्वतःच्या मालकीच्या आणि भाडेतत्त्वावरील दोन हजार 700 बस असून, त्यातून दररोज सरासरी 30 लाख प्रवासी प्रवास करतात.नवीन बदलांमुळे गर्दीच्या वेळी बेस्ट बसची मेट्रो स्थानकांना, प्रमुख रेल्वे स्थानकांना आणि व्यावसायिक केंद्रांशी प्रभावीपणे जोडणे शक्य होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मेट्रो आणि रेल्वेमधून प्रवास झाल्यानंतर तत्काळ बसमधून इच्छितस्थळी जाता येईल.त्याचा मोठा फायदा शाळा-कॉलेजचे विद्यार्थी, कार्यालयीन कर्मचारी, महिला प्रवासी आणि ज्येष्ठ नागरिकांना होईल, असा दावा बेस्ट उपक्रमाने केला आहे.
बेस्टच्या ताफ्यात नुकत्याच 157 इलेक्ट्रिक एसी बस दाखल झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना आरामदायी सेवा मिळणार आहे.
जाणून घ्या ए-207 मार्ग
‘बेस्ट’ने वर्ल्ड ट्रेड सेंटर ते सीएसएमटी हा नवा मार्ग सुरू केला आहे. हा मार्ग जी. डी. सोमानी मार्ग, कुलाबा मार्केट, बेरेक नं.१, नवी नगर, सह्याद्री नगर, एल्फिन्स्टन ब्रीज, दादर, प्रभादेवी,महालक्ष्मी, हाजी अली, पेडर रोड, गिरगाव चौपाटीमार्गे सीएसएमटी ही बस धावेल.खासगी, सरकारी आणि विविध संस्थांमध्ये काम करणाऱ्यांना या बस मार्गाचा फायदा होणार आहे.
पूर्व उपनगरात बेस्ट बसचे जाळे अधिक सक्षम होणार
गोरेगाव, दिंडोशी, ठाणे लिंक रोड, विक्रोळी, घाटकोपर-अंधेरी, भांडुप व मुलुंड परिसरातील बसमार्गाचा विस्तार केल्याने पूर्व उपनगरातील नागरिकांसाठी प्रवासी सुविधा अधिक सक्षम होणार आहे. त्यामुळं प्रवासीसंख्येत वाढ होईल, अशी आशा बेस्ट प्रशासनाला आहे.
वातानुकूलित बसमार्गामध्ये असे होणार फेरबदल
ए-207- मालवणी आगार ते दहिसर बसस्थानक
ए-211-वांद्रे बसस्थानक ते फादर अँग्नेल आश्रम
ए-215-वांद्रे रेक्लेमेशन ते टाटा वसाहत
ए-399-ट्रॉम्बे ते महाराणा प्रताप चौक (मुलुंड)
ए-410-विक्रोळी आगार ते महाकाली गुंफा
ए-604-नागपाडा स्थानक ते महाकाली मुहा
ए-605-भांडुप स्टेशन ते टेम्भीपाडा
ए-६०६-भांडुप स्टेशन ते अशोक केदारे चौक








