पश्चिम तुर्कीमध्ये मोठा भूकंप आला असून यामुळे जवळपास 3 इमारती कोसळल्या आहेत. यापूर्वी देखील भूकंपामुळे या इमारतींचे नुकसान झाले होते. या तीव्रतेच्या भूकंपात अनेक लोक जखमी झाले असून यात अद्यापतरी कोणाचा मृत्यू झाल्याची बातमी नाही. आपत्ती आणि आपत्कालीन व्यवस्थापन एजन्सी, AFAD च्यानुसार, बालिकेसिर प्रांतातील सिंदिरगी शहरात 6.1 तीव्रतेच्या भूकंपाचे केंद्रबिंदू होते. स्थानिकवेळेनुसार हा भूकंप रात्री 11:48 वाजता 5.99 किलोमीटर (3.72 मील) च्या खोलीवर आला होता. हा भूकंप एवढा तीव्र होता की याचे धक्के हे जवळच्या इस्तंबू, लबुर्सा, मनिसा आणि इझमीर इत्यादी शहरांमध्ये सुद्धा जाणवले.
किती लोकांना दुखापत?
तुर्कीचे गृहमंत्री अली येरलिकाया यांनी या भूकंपाबाबत बोलताना म्हटले की, सिंदिरगीमध्ये तीन रिकाम्या इमारती आणि एक दुमजली दुकान कोसळलं. या इमारती यापूर्वीच आलेल्या भूकंपामुळे नुकसानग्रस्त झाल्या होत्या. बालिकेसिरचे राज्यपाल इस्माईल उस्ताओग्लू यांच्या माहितीनुसार या भूकंपात जवळपास 22 लोक जखमी झाल्याची शक्यता आहे.
सुदैवाने कोणाचाही मृत्यू नाही :
सिंदिरगीचे जिल्हा प्रशासक डोगुकान कोयुंकू यांनी अनाडोलू एजन्सीला सांगितले की, ‘अद्याप आम्हाला या भूकंपात कोणाचाही मृत्यू झाल्याची माहिती मिळालेली नाही. परंतू आम्ही आमचं आकलन सुरु ठेवलेलं आहे’. हॅबरटर्क टेलिव्हिजनने माहिती दिली की, भूकंप झाला तेव्हा बरेच लोक घराबाहेर पडले त्यांना घरात जाण्यास भीती वाटत होती.
सिंदिरगीमध्ये ऑगस्ट महिन्यात सुद्धा 6.1 तीव्रतेचा भूकंप आला होता, ज्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. यात अनेक लोक जखमी झाले होते तर एकाच मृत्यू सुद्धा झाला होता. त्यानंतर बालिकेसिरच्या आसपास छोटे छोटे भूकंप आले होते. तुर्कीये हे प्रमुख फॉल्ट लाइन्सच्या वर आहे त्यामुळे येथे वारंवार भूकंप होतात. 2023 मध्ये, तुर्कीमध्ये 7.8 तीव्रतेचा भूकंप आला होता ज्यात 53,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. अनेक इमारती कोसळल्या होत्या. तर शेजारील सीरियाच्या उत्तरेकडील 6,000 लोकं मारले गेले होते.









