एका शेतकऱ्याचा बँकेतून चोरी झालेल्या 4 लाखाच्या चेक प्रकरणी अखेर बँक ऑफ महाराष्ट्रकडून (Solapur Bank Of Maharashtra) पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सोयाबीन विकल्यानंतर कंपनीने दिलेला चेक शेतकऱ्याने सोलापुरातील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये जमा केला. पण एका व्यक्तीने तो चेक परस्पर लंपास केला. त्यामुळे ते चार लाख रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर जमा न होता त्या व्यक्तीच्या नावावर जमा झाले. यानंतर सात ते आठ दिवस बँकेच्या चकरा मारल्यानंतरही बँकेने कोणतीही दखल घेतली नव्हती.
बँक ऑफ महाराष्ट्रच्या सोलापुरातील नवी पेठ शाखेतून एका व्यक्तीने बँकेच्या चेक बॉक्समधून चेक चोरल्याची तक्रार आहे. अमर तेपेदार या नावाच्या व्यक्तीने हा चेक चोरल्याची तक्रार पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
अमर तेपेदार या व्यक्तीने बँकेत येऊन मी जमा केलेल्या चेकच्या स्लिपमध्ये अकाउंट नंबर चुकलाय असं सांगून ड्रॉपबॉक्स उघडायला लावला. त्यावेळी बँक कर्मचारी कामात असताना त्यांची नजर चुकवून त्याने चेक लंपास केला अशी तक्रार बँकेतर्फे देण्यात आली. दरम्यान, बँक प्रशासनाने या बाबतीत कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
Solapur Bank Of Maharashtra : नेमकं काय प्रकरण?
मूळचे बार्शीतील असलेल्या उत्तम दत्तात्रय जाधव या शेतकऱ्याने सोयाबीनचे बिल म्हणून मिळालेला चेक सोलापुरातील नवी पेठ बँक शाखेच्या ड्रॉप बॉक्समध्ये टाकला होता. पण या शेतकऱ्याच्या नावावर पैसे जमा न होता तिसऱ्याच व्यक्तीच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचा आरोप करण्यात आला. सोलापुरातल्या बँक ऑफ महाराष्ट्र, नवी पेठ शाखेतल्या प्रशासनाने मात्र या प्रकरणावर सोयीस्कर मौन धारण केलं. त्यामुळे उत्तम दत्तात्रय जाधव हे शेतकरी चांगलेच अडचणीत आले.
उत्तम जाधव यानी सोलापुरातील एका कंपनीला सोयाबीन विकलं होतं. त्या बदल्यात कंपनीने चार लाख रुपयांचा चेक जाधव याना दिला. शेतकरी उत्तम जाधव यांनी हा चेक सोलापुरातल्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या नवी पेठ येथील शाखेत जमा केला. मात्र पैसे खात्यावर जमा का झाले नाही याची माहिती घ्यायला गेल्यानंतर चेक बँकेत आढळून आला नाही.
धक्कादायक बाब म्हणजे हे पैसा त्रयस्त व्यक्तीच्या नावावर ट्रान्सफर झाल्याचे बँक कर्मचाऱ्यांनी सांगितल्याचा दावा देखील शेतकऱ्यांनी केला. मागील सात ते आठ दिवसापासून शेतकरी बँक ऑफ महाराष्ट्रच्या खेटा मारत आहे. मात्र बँकेकडून या संदर्भात कोणतीही दखल घेतली जातं नसल्याचा त्याने आरोप केला.
या संदर्भात एबीपी माझाने बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र बँक अधिकाऱ्यांनी या संदर्भात कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. एबीपी माझाच्या बातमीच्या धसक्याने अखेर बँकेने पोलीस तक्रार दाखल केली आहे.
