खेळ विश्वातील अनेक कहाण्या या प्रेरणा देऊन जातात. अशीच एक घटना सध्या सुरु असलेल्या पॅरा अॅथलिट 2025 मध्ये घडली. 2025 न्यू वर्ल्ड पॅरा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पोलंडची पॅरा अॅथलिट रोझा ही सकाळी हॉस्पिटल बेडवर होती, तर संध्याकाळी तिने स्पर्धेत सहभागी होऊन गोल्ड मेडल जिंकून सर्वांना आश्चर्यचकित केलं. पॅरा अॅथलिट 2025 ही (Para Athletics 2025) स्पर्धा आतापर्यंत भारतात आयोजित करण्यात आलेली सर्वात मोठी पॅरा स्पर्धा आहे. ज्यात तब्बल 104 देशांच्या 2200 हून अधिक अॅथलिटने सहभाग घेतला आहे.
हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याच्या काही तासांनी मैदानात पुनरागमन :
30 सप्टेंबरच्या सकाळी पोलंडची पॅरा अॅथलिट रोझा (Roza Kozakowska) ही अचानक हीट स्ट्रोक आणि डिहाइड्रेशनचा त्रास झाल्यामुळे बेशुद्ध पडली होती. उलट्या आणि शरीरात ट्रेन नसल्याने तिला दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी तिला स्पष्ट शब्दात सांगितलं की तिला आराम करायची गरज आहे. खेळात भाग घेणं तिच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. पण रोजाने हिम्मत दाखवली आणि डॉक्टरांना सांगितलं की, ‘मी फक्त इथं उपस्थिती लावण्यासाठी नाही तर खेळण्यासाठी आलीये’. त्यानंतर तिने हट्ट केला आणि हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेऊन सरळ स्टेडियमवर पोहोचली.
फक्त गोल्ड मेडलच नाही रेकॉर्ड सुद्धा केला :
2025 न्यू वर्ल्ड पॅरा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये महिलेने एफ-32 क्लब थ्रो इवेंटमध्ये भाग घेतला. तिचं शरीर खूप कमजोर होतं. पण तिची हिम्मत कायम होती. तिनं 29.30 मीटर थ्रो केला, तिच्या थ्रोने चॅम्पियनशिपमध्ये एक नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला आणि या थ्रोमुळेच रोझाने सुवर्णपदक मिळवून दिले. सामन्यानंतर रोझा भावुक झाली. तिने सांगितलं की, ‘हे पदक भारतीय डॉक्टर आणि त्यांच्या टीमला समर्पित करते, जर त्यांनी माझी काळजी घेतली नसती आणि पाठिंबा दिला नसता तर मी मैदानावर परतू शकले नसते’.
संघर्षाने भरलेलं जीवन :
रोझा कोझाकोव्स्का हिला लहानपणीपासून ब्लड डिसऑर्डर होता, ज्यासाठी तिची कीमोथेरेपी झाली होती. यानंतर लाइम रोगामुळे, तिला क्वाड्रिप्लेजिक झाले, म्हणजेच तिच्या चारही अंगांमध्ये पक्षाघातासारखी लक्षणे दिसू लागली. तरीही तिने जिद्द कायम ठेवली आणि 2019 च्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत आणि 2020 च्या टोकियो पॅरालिंपिकमध्ये पदकं जिंकली. रोझा कोझाकोव्स्का ही जगातील सर्वोत्तम पॅरा-अॅथलीट्सपैकी एक आहे.
