पाकिस्तानने आशिया कप 2025 च्या (Asia Cup 2025) सेमी फायनलमध्ये गुरुवारी रात्री बांगलादेशचा पराभव करून फायनलमध्ये एंट्री मिळवली आहे. त्यामुळे 28 सप्टेंबर रोजी रविवारी होणाऱ्या आशिया कप फायनलमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान (India VS Pakistan) यांच्यात सामना पार पडणार आहे. तब्बल 41 वर्षांनी आशिया कपच्या इतिहासात भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार आहे. तेव्हा आशिया कपच्या विजेत्याला मिळणारी ट्रॉफी (Asia Cup Trophy) नेमक्या कोणत्या धातूने बनवली गेलीये, त्यात किती सोनं आणि किती चांदी आहे याविषयी जाणून घेऊयात.
आशिया कपच्या विजेत्याला लखलखणारी सुंदर ट्रॉफी दिली जाते. आशिया कपची ट्रॉफी ही केवळ आशिया क्रिकेटच्या प्रतिष्ठेचं प्रतीक नाही तर ही ट्रॉफी कशाने बनवली जातेय, याची धातू सामग्री आणि डिझाइनचे देखील विशेष महत्त्व आहे. आशिया कप ट्रॉफी सोन्याचा मुलामा असलेल्या धातूपासून बनलेली आहे. त्यावर चांदीचा थर आहे. याचा अर्थ असा की ट्रॉफीचा बाह्य पृष्ठभाग सोन्याने मढवलेला असून त्याची मुख्य रचना चांदीची आहे.
कशी आहे डिझाईन :
2019 मध्ये आशिया कप ट्रॉफीची नवीन डिझाईन समोर आणण्यात आली. लंडनचे प्रसिद्ध सिल्वरस्मिथ थॉमस लाइट याने ही ट्रॉफीची डिझाईन बनवलेली आहे. या ट्रॉफीची उंची 78 सेंटीमीटर आणि लांबी 42 सेंटीमीटर आहे. याच वजन जवळपास 15 किलोग्रॅम आहे. त्याची रचना कमळाच्या फुलापासून प्रेरित आहे, जी आशियामध्ये शांती, एकता आणि सौहार्दाचे प्रतीक मानली जाते. विजेत्या देशांची नावे ट्रॉफीच्या तळाशी कोरलेली असतात, जी ट्रॉफीच्या मुख्य भागापासून वेगळी करता येते.
आशिया कपची ट्रॉफी बनवण्यासाठी जवळपास 400 तासांचा वेळ लागला होता. ज्यात तब्बल 12 कारागिरांनी सहभाग घेतला होता. त्याची रचना आणि कारागिरी त्याला एक प्रतिष्ठित ट्रॉफी बनवते. आशिया कप ट्रॉफी हा केवळ एक क्रीडा पुरस्कार नाही तर आशियाई क्रिकेटच्या समृद्धतेचे आणि वैभवाचे प्रतीक आहे.
