बिबट्याने (Leopard) घराच्या ओट्यावरून हल्ला करून उचलून नेलेल्या चिमुकल्या श्रुतिकचा मृतदेह तब्बल 19 तासांच्या शोधकार्यानंतर सापडला. महिनाभरात दोन बालकांचा बिबट्याने बळी घेतल्यामुळे नागरिकांमध्ये वन विभागाच्या (Forest Department) कारभाराबद्दल संताप व्यक्त होत आहे. अवघ्या दोन वर्षांच्या श्रुतिक गंगाधर नावाच्या चिमुकल्याला त्याच्या घराच्या ओट्यावरून नरभक्षक बिबट्याने हल्ला करून उचलून नेले होते. या घटनेने संपूर्ण वडनेर (Wadner) परिसरात भीती आणि दहशत पसरली आहे. लष्कराचे जवान आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून श्रुतिकचा शोध घेतला जात होता. अखेर 19 तासांनंतर या दोन वर्षाच्या बालकाचा मृतदेह बुधवारी दुपारी आर्टिलरीच्या जंगलात आढळला आणि सर्वजण सुन्न झाले. (Nashik Leopard Attack)
याबाबत अधिक माहिती अशी की, वडनेर गेट परिसरातील कारगिल गेटजवळ असलेल्या कार्टरमध्ये राहणाऱ्या कुटुंबातील दोनवर्षीय श्रुतिक सायंकाळी घराबाहेर खेळत होता. अचानक जवळच्याच झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने क्षणार्धात त्याच्यावर झडप घातली आणि जबड्यात परून जंगलाच्या दिशेने ओढत नेले. काही कळण्याच्या आत घडलेल्या या प्रकाराने मुलाच्या आईने हंबरडा फोडला. पण तोपर्यंत बिबट्या अंधारात पसार झाला होता.
आर्टिलरीच्या जंगलात आढळला मृतदेह
यानंतर त्याचा शोध घेण्यासाठी आर्टिलरी सेंटरचे जंगल लष्कराचे जवान व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पिंजून काढले. सुमारे अडीचशे ते तीनशे अधिकारी, कर्मचारी मृत बालकाचा शोध घेत होते. त्यासाठी थर्मल ड्रोन, श्वानपथक यांचा वापर करण्यात आला. त्यानंतर बुधवारी (दि. 24) दुपारी तीन वाजता श्रुतिकचा मृतदेह आर्टिलरीच्या जंगलात आढळून आला. श्रुतिकचे वडील गंगाधर लष्करी जवान असून, ते मूळचे कर्नाटकचे आहेत. त्यांची एक वर्षापूर्वीच नाशिकरोडच्या आर्टिलरी सेंटरमध्ये बदली झाली होती. श्रुतिक हा एकुलता मुलगा होता. मात्र, त्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
नागरिकांचा वन विभागावर संताप
विशेष म्हणजे, मागील ऑगस्टमध्ये वडनेर दुमाला येथे आयुष भगत या तीन वर्षांच्या बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यावेळी वन विभागाने बिबट्याला जेरबंद करण्याचे आश्वासन दिले होते. या मागणीसाठी माजी नगरसेवक केशव पोरजे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी मुसळधार पावसात वन विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढून जाब विचारला होता. मात्र, वन विभागाच्या अजगरासारख्या सुस्त कारभारामुळे आज पुन्हा एकदा एका निष्पाप बालकाचा जीव गेला, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत. अजून किती चिमुकल्यांचा बिबट्याच्या हल्ल्यात बळी जाण्याची वाट वन विभाग पाहणार आहे? असा संतप्त सवाल देखील स्थानिकांनी उपस्थित केला आहे.
