मुंबईतल्या कोस्टल रोडवर गुरुवारी (25 सप्टेंबर) सकाळी एका कारला अचानक आग लागल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली.
सकाळी सुमारे 9.30 वाजता दक्षिणेकडील (साऊथबाउंड) टनेलमध्ये ही घटना घडली.मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी सोशल मीडियावर माहिती देत सांगितले की, कोस्टल रोड टनेलमधून उत्तर मुंबईहून दक्षिण मुंबईकडे जाणारी वाहतूक तात्पुरती थांबवण्यात आली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका पांढऱ्या कारला अचानक आग लागल्याचे दिसत आहे. आगीचे मोठमोठे ज्वाळा बाहेर येताना दिसले, तर धूर संपूर्ण टनेलमध्ये पसरला.
हे दृश्य पाहून प्रवाशांमध्ये घबराट पसरली. टनेलमधून जाणाऱ्या एका वाहनातून हे व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आले असल्याचे समजते.
या घटनेनंतर वाहतूक हाजी अली आणि वरळी कनेक्टरकडे वळवण्यात आली. जवळपास अर्धा तास वाहतूक ठप्प होती. मात्र, परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर ट्रॅफिक पोलिसांनी पुन्हा वाहनांची हालचाल सुरळीत केली.
या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कोस्टल रोड टनेलमधील कार आगीमुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
