मुसळधार पावसामुळे मराठवाडा, खान्देश, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी सतत केली जात आहे. यादरम्यान सत्ताधाऱ्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा करण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदेही शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचले आहेत. दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांनी एखाद्या योजना कमी जास्त करता येईल, मात्र शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे असं मुख्यमंत्र्यांनी देखील ठरवलं असल्याची माहिती दिली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, “शेतकरी हवालदिल झाला असून, त्याला तातडीने मदत केली पाहिजे असा मुख्यमंत्र्यांचा मानस आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्याला कितीही खर्च आला तरी पैसा उपलब्ध करुन देऊ. शेतकऱ्यासाठी पैसे कमी नाही. अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला बाहेर काढलं पाहिजे यासाठी सरकार पूर्ण मदत करेल. मी महसूल मंत्री या नात्याने पंचनाम्यासंदर्भा सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी मदतीची जी योजना तयार केली आहे ती पुढे नेऊ”.
“पंचनामा चुकला तर शेतकऱ्याला अडचण येईल. त्यातील एकही शेतकरी चुकू नये. जसं फिल्डवर जाणं महत्त्वाचं आहे तसं अधिकाऱ्याने पंचनाम्यात चूक करु नये हे महत्त्वाच आहे. मागील 50 वर्षात जितका पाऊस झाला नाही तितका पाऊस झाला. मालमत्ता, शेती जनावरांचे नुकसान झाले. प्रशासन जिल्हाधिकारी ते ग्रामपंचायत पर्यंत ते एनडीआरएफ आणि एसडीआरएफ देखील काम करत आहेत. पालकमंत्र्यांना फिल्डवर राहा सूचना दिल्या आहेत. मला सूचना आहेत की पंचनाम्यांकडे लक्ष द्या. पंचनामे झाल्याशिवाय मदत मिळत नाही,” असं त्यांनी सांगितलं.
“पंचनामे जिल्हाधिकारी यांच्याकडून घेऊन मदत व पुनर्वसन मंत्री आणि महसूल मंत्री म्हणून मी पूर्ण करत आहे. खरडून गेलेल्या जमिनी आणि शेतीचं नुकसान यासाठी वेगवेगळे जीआर निघत आहेत. एखाद्या योजना कमी जास्त करता येईल मात्र शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे असं मुख्यमंत्र्यांनी देखील ठरवलं आहे. शेतकऱ्यांसाठी पैसे आमच्याकडे कमी नाही, अडचणीत असेल तर बाहेर काढलं पाहिजे ही आमची भावना आहे,” असंही ते म्हणाले.
एकनाथ शिंदेंनी मदतीच्या साहित्यावर केलेल्या जाहिरातीवर ते म्हणाले की, “एकनाथ शिंदे हे भावनिक नेते आहेत, अशात त्यांनी काही केले असेल. मात्र मला माहिती नाही अधिक त्यामुळे त्यावर मी काय बोलू”.
“अनेकांनी असे फोटो लावलेत आहेत. काय काय कशी मदत केली होती विरोधकांनी हे सर्वांना माहिती आहे. जाहिरातबाजी मदतीत येऊ नये. मला राजकारण आणायचं नाही. मतं मिळवण्याचा हा प्रसंग नाही. लोकांना आधार देण्याचे हे काम आहे. जाहिरातबाजी न करण्याची जबाबदारी आपली आहे. विरोधकांनी मात्र यासंदर्भात राजकारण केलं आहे. सरकारची जबाबदारी आहे मदत करणे, टोमणे मारण्यापेक्षा काय काय केलं पाहिजे हे सांगा”, असा टोलाही त्यांनी लगावला.
