Search
Close this search box.

कसं शक्यंय? विमानाच्या लँडिंग गिअरमध्ये लपून प्रवास; 13 वर्षीय अफगाण मुलगा काबुलमधून थेट दिल्लीत

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

विमान प्रवासाची अनेकांच्याच मनात भिती असते. ही भिती अनेक प्रकारची असते. काहींना उंचीची भिती वाटते, काहींना कोंदट वातावरणाचा त्रास होतो. मात्र एक थरारक विमान प्रवास करत 13 वर्षीय मुलानं भितीचे हे सर्व प्रकार नगण्य ठरवत सर्वांनाच धक्का दिला आहे. प्राथमिक माहितीनुसार या मुलानं चक्क विमानाच्या लँडिंग गिअरमध्ये बसून प्रवास केला.

मूळचा अफगाणिस्तानातील हा मुलगा काबूलहून दिल्लीला येणाऱ्या विमानाच्या लँडिंग गिअरमध्ये लपून प्रवास करत भारतात पोहोचल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान उतरल्यानंतर हा मुलगा सुरक्षा कर्मचाऱ्यांना तिथं वावरताना आढळला. विचारपूस केली असता हा मुलगा छुप्या पद्धतीनं इराणला जाऊ इच्छित होता, मात्र चुकून तो भारतात येणाऱ्या विमानात बसला आणि दिल्लीत पोहोचला. ज्यानंतर आता काबुल विमानतळावरील सुरक्षिततेसंदर्भातही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

एका प्रतिष्ठीत वृत्तसमुहाच्या माहितीनुसार काबुलहून दिल्लीला येणाऱ्या विमान क्रमांक आरक्यू4401 ला या प्रवासासाठी साधारण 94 मिनिटं लागली. या विमान प्रवासादरम्यान हा मुलगा विमानाच्या मागील चाकाच्या वरील भाहामध्ये बसून राहिला. भारतीय प्रमाण वेळेनुसार हे विमान काबुलहून 8.46 वाजता रवाना होऊन 10.20 मिनिटांनी भारतात टर्मिनल 3 इथं पोहोचलं.

घटनाक्रम वाचून व्हाल हैराण…
अफगाणी मुलानं चौकशीदरम्यान दिलेल्या माहितीनुसार त्यानं काबुल विमान प्रवासादरम्यान प्रवाशांमागोमाग तिथं विमानात प्रवेश करण्याच्या प्रयत्नांदरम्यान त्यानं व्हीलमध्ये अर्थात चाकात प्रवेश केला. विमानाने उड्डाण केल्यानंतर प्रचंड थंड आणि ऑक्सिजनच्या कमतरतेसारख्या जीवघेण्या परिस्थितीतही तो कसा तग धरू शकला हाच प्रश्न सध्या तज्ज्ञांना पडत आहे. माध्यमांनुसार या मुलाचं वय 13 ते 15 वर्षांदरम्यान असल्याचं सांगण्यात येत आहे.

मुलाकडे कोणत्याही प्रकारचं ओळखपत्र किंवा प्रवास दस्तऐवज आढळला नसून, अफगाणिस्तानमधील अस्थिर परिस्थितीमुळे अनेकजण देश सोडण्याचा प्रयत्न करत असतानाच ही अशी घटना घडणंही या अस्थिरतेचाच एक भाग असल्याचा तर्क लावला जात आहे. दरम्यान या मुलाला सध्या ताब्यात घेण्यात आलं असून, त्याची चौकशी सुरू आहे. भारतीय अधिकाऱ्यांनी याप्रकरणी अफगाण दूतावासाशी संपर्क साधला असून, पुढील कारवाई सुरू केल्याची माहिती जारी केली आहे.

जाणकार काय म्हणतात?
जाणकारांच्या मते 10000 फूट उंचीहून अधिक अंतरावर गेल्यानंतर ऑक्सिजनची पातळी अतिशय कमी होत काही क्षणांत बेशुद्ध व्हायला होतं. यातच उणे 40 ते 60 अंशांमध्ये हिमदंशामुळं हायपोथर्मियानं मृत्यू ओढावतो. त्यामुळं अशा विमानाच्या चाकातून प्रवास करणाऱ्या पाच जणांतून एकाच्याच वाचण्याची शक्यता असते. त्यामुळं आता या प्रकरणानं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वांचच लक्ष वेधलं आहे.

admin
Author: admin

और पढ़ें