एका 16 वर्षांच्या मुलावर वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. केरळ पोलिसांनी याप्रकरणी 9 जणांना अटक केली असून त्यामध्ये एक राजकारणी, दोन सरकारी कर्मचारी आणि एका फुटबॉल प्रशिक्षकाचा समावेश आहे. संशयितांनी समलैंगिक डेटिंग अॅपवरुन किशोरवयीन मुलाशी मैत्री केल्याची प्राथमिक माहिती आहे.
कासरगोडच्या पोलीस प्रमुख विजया भरत रेड्डी म्हणाले की, दहावीच्या विद्यार्थ्याने दोन वर्षांपूर्वी हे अॅप डाउनलोड केले होते. मागील दोन वर्षात कासरगोड, कन्नूर, कोझिकोड आणि एर्नाकुलममधील एकूण 14 पुरूषांनी त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा संशय आहे.
“मुलाच्या घरी आणि इतर जिल्ह्यांमध्ये विविध ठिकाणी नेऊन त्याच्यावर अत्याचार करण्यात आले. एके दिवशी मुलाच्या आईला आपण घरी आल्यानंतर एका पुरूषाला पळून जाताना पाहून संशय आला. तिने मुलाला विचारलं तेव्हा त्याने काय घडलं ते सांगितलं. आईने ताबडतोब मुलांशी संबंधित हेल्पलाइनशी संपर्क साधला, ज्यांनी नंतर पोलिसांना कळवले,” अशी माहिती रेड्डी यांनी दिली.
मुलाच्या जबाबानंतर, पोलिसांनी 16 जणांविरुद्ध लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायदा, 2012 अंतर्गत 14 वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत.
कासरगोड जिल्ह्यात घडलेल्या आठ प्रकरणांची चौकशी करण्यासाठी पोलिस उपअधीक्षक आणि चार निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली एक विशेष तपास पथक स्थापन करण्यात आलं आहे. उर्वरित सहा प्रकरणं तपासासाठी कोझिकोड आणि कन्नूर जिल्ह्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आली आहेत.
14 संशयितांचं वय 25 ते 51वयोगटातील आहेत. आरोपींपैकी एक रेल्वे कर्मचारी असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे पोलीस अॅप देखील तपासत आहेत, जिथे सेल्फ रिपोर्टिंग आणि वय पडताळणीची तरतूद होती, जेणेकरून अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण होण्यासाठी त्यातील त्रुटी कारणीभूत ठरल्या असाव्यात.
