दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात नेहमीच मोठी तगडी सुरक्षा व्यवस्था तैनात असते. अशातच लाल किल्ला परिसरात आयोजित जैन समुदायाच्या धार्मिक कार्यक्रमातून एका अमूल्य कलशाची चोरी झाल्याची घटना घडली आहे. सोने, हिरे आणि इतर रत्नांनी जडवलेला कलश घेऊन एक व्यापारी तिथे पोहोचला होता. मात्र, स्टेजवरुनच हा कलश चोरीला गेल्याने एकच खळबळ उडाली आहे.
व्यापारी सुधीर जैन यांच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात ई- एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. आरोपीचीही ओळख पटली आहे. लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लाल किल्ल्याच्या परिसरात 28 ऑगस्टपासून जैन समुदायाचा धार्मिक कार्यक्रमक सुरू आहे. हा कार्यक्रमक 9 सप्टेंबरपर्यंत सुरू राहील. यासाठी एक खास व्यासपीठ तयार करण्यात आले होते. जिथे फक्त धोतर परिधान केलेले आणि परवानगी असलेले लोक बसू शकत होते. सिव्हिल लाईन्सचे रहिवासी व्यापारी सुधीर जैन दररोज त्यांच्या घरातून पूजेसाठी एक मौल्यवान कलश आणत असत. हा कलश 760 ग्रॅम सोन्यापासून बनलेला आहे. त्यावर हिरे, माणिक आणि पन्ना अशा 150 ग्रॅम रत्ने देखील जडवलेली आहेत. कलश प्रार्थनास्थळी ठेवण्यात आला होता
मंगळवारी पूजेसाठी जैन बांधवही कलश घेऊन आले होते. कलश पूजास्थळी ठेवण्यात आला होता आणि भाविक त्याच्याभोवती बसले होते. दरम्यान, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला देखील पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार विधीत सहभागी होण्यासाठी आले. कार्यक्रमाचे आयोजक आणि इतर लोक त्यांचे स्वागत करण्यात व्यस्त झाले. बिर्ला तेथून निघून गेल्यावर पूजास्थळी ठेवलेला कलश गायब असल्याचे आढळून आले. एकीकडे, या प्रकरणात असे म्हटले जात आहे की बिर्ला यांच्या आगमनामुळे झालेल्या गोंधळाचा फायदा घेऊन चोराने कलश चोरला, तर दुसरीकडे पोलिसांचा दावा आहे की बिर्ला कार्यक्रमस्थळी निघून गेल्यानंतर चोरी झाली.
असे म्हटले जाते की आरोपी तिथे नियमितपणे येत होता. तो इतर लोकांप्रमाणे धोतर आणि वर कापड घालून येत असे. तिथे येणाऱ्या लोकांशी तो खूपच मैत्रीपूर्ण होता, म्हणून तो सहजपणे पूजास्थळी पोहोचला आणि संधी पाहताच कलश चोरला. आरोपी कलश घेऊन जातानाचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे.
