बिहारमधील दरभंगा येथील एका व्यासपीठावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईबद्दल वापरण्यात आलेल्या आक्षेपार्ह शब्दांच्या निषेधार्थ गुरुवारी (4 सप्टेंबर) पाच तासांसाठी बिहार बंद ठेवण्यात आला. भाजपच्या महिला मोर्चाने हा बंद पुकारला होता. राजद नेते तेजस्वी यादव यांनी याला सुपर फ्लॉप म्हटले आहे.
“मैं भी मां हूं” म्हणत दुकान लुटलं
कालच्या बिहार बंद दरम्यान, भाजप महिला मोर्चाच्या नेत्यांनी मुझफ्फरपूरमध्ये एका साडीच्या दुकानात लुटमार केली आणि “मैं भी मां हूं (मीही एक आई आहे)” अशा घोषणा दिल्या. राजद सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांनी इन्स्टाग्रामवर लिहिले की, “पंतप्रधान मोदींनी आज संपूर्ण बिहार आणि बिहारींच्या माता, बहिणी आणि मुलींना शिवीगाळ करण्याचे आदेश भाजप सदस्यांना दिले आहेत का? गुजरातींनी बिहारींना इतके हलके घेऊ नये. हे बिहार आहे. भाजपचे गुंड आदरणीय शिक्षक, रस्त्यावर चालणाऱ्या महिला, विद्यार्थिनी, गर्भवती महिला, वृद्ध लोक आणि पत्रकारांना शिवीगाळ करत आहेत, त्यांना मारहाण करत आहेत आणि त्यांच्याशी गैरवर्तन करत आहेत? हे बरोबर आहे का? लज्जास्पद आहे!”
‘एकही सामान्य माणसाचा पाठिंबा मिळाला नाही’
तेजस्वी यादव म्हणाले की, “भाजप आणि एनडीएने आयोजित केलेला बिहार बंद खूपच अपयशी ठरला. भाजप आणि एनडीएला एकाही सामान्य माणसाचा पाठिंबा मिळाला नाही, उलट भाजपच्या लोकांनी रस्त्यावर गुंडगिरी केली. महिला आणि शिक्षकांशी गैरवर्तन करण्यात आले, रुग्णवाहिका थांबवण्यात आल्या, सामान्य नागरिकांना जबरदस्तीने त्रास देण्यात आला. हे सर्व चित्र आज बिहार बंदमध्ये दिसले, म्हणजेच पंतप्रधानांनी आयोजित केलेल्या बंदमध्ये आणि भाजपच्या लोकांना बिहारच्या एकाही नागरिकाचा पाठिंबा मिळाला नाही.”
