बाप तैसा बेटा अशी एक म्हण आहे. म्हणजेच जे वडील करतात त्याची पुनरावृत्ती मुलाकडून केली जाते. ही म्हण तंतोतंत लागू होत आहे भारताचा माजी स्फोटक सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवाग आणि त्याचा मुलाला! विरेंद्र सेहवाग जवळपास दहा वर्षांपूर्वी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडिमवर शेवटचा सामना खेळला. त्यानंतर एका दशकाने याच अडनावाच्या चिमुकल्याने याच मैदानावर अनेकांना विरुच्या फटकेबाजीची आठवण करुन दिली. विरेंद्र सेहवागची आठवण करुण देणारा हा चिमुकला म्हणजे त्याचा थोरला मुलगा आर्यवीर सेहवाग! दिल्ली प्रिमिअर लीग टी-20 स्पर्धेमध्ये आर्यवीरने अडनावाला साजेसं पदार्पण केलं.
अनुभवी गोलंदाजांचा समाचार
आर्यवीरने त्याच्या वडिलांप्रमाणेच, डावाची संयमी सुरुवात करताना स्थिरावण्यास थोडा वेळ घेतला. त्याने चौथ्या चेंडूवर थर्ड मॅनकडे एक धाव घेत आपलं खातं उघडलं. आर्यवीर अजून काही वेळ घेईल असं वाटत असतानाच तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीला त्याने फटकेबाजीला सुरुवात केली. अनुभवी गोलंदाज नवदीप सैनीविरुद्ध आर्यवीरने त्याच्या वडिलांची आठवण यावी अशी आक्रमक फटकेबाजी सुरु केली. सैनीने किंचित ओव्हरपिच केलेल्या पहिल्या चेंडूवर आर्यवीरने डीप एक्स्ट्रा कव्हरमधून चौकार लगावला. चेंडू ऑफसाइडमधून इनफिल्डवरून गेला. पुढच्या चेंडूवर, तो ट्रॅकवर पुढे येऊन फटकेबाजी करु लागला. त्याने अतिरिक्त कव्हर आणि लाँ-ऑफ दरम्यान चेंडू टोलावत सलग दुसरा चौकार मारला.
फटकेबाजीच्या नादात बाद
यश धुलने दुलीप ट्रॉफीमध्ये उत्तर दिल्ली झोनमधून खेळण्यासाठी शिबिर सोडल्यानंतर त्याच्या जागी आर्यवीरला संधी मिळाली. त्यानंतर पुढल्या ओव्हरमध्येही आर्यवीरने सलग दोन चौकार मारले. डावखुरा फिरकीपटू रौनक वाघेलाविरुद्ध, त्याने पहिला चौकार थर्ड मॅनवरुन आणि दुसरा लाँग-ऑनच्या दिशेने मारला. मात्र फटकेबाजीच्या नादात त्याच ओव्हरमध्ये आर्यवीर 16 चेंडूत 22 धावा काढून बाद झाला. तुम्हीच पाहा आर्यवरीची ही छोटेखानी पण स्फोटक खेळी…
यापूर्वीही दमदार कामगिरी
डीपीएल 2025 च्या लिलावात सेंट्रल दिल्ली किंग्जच्या संघाने 8 लाख रुपयांना आर्यवीरला करारबद्ध केलं. गेल्या वर्षी, आर्यवीरने विनू मंकड ट्रॉफीमध्ये दिल्लीसाठी पदार्पणातच चमकदार कामगिरी केली. संघाने सहा विकेटने विजय मिळवला तेव्हा आर्यवीरने 49 धावा केलेल्या. काही महिन्यांनंतर, त्याने कूचबिहार ट्रॉफीमध्ये मेघालयविरुद्ध 229 चेंडूत 34 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 200 धावा कुटल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याने जवळजवळ तिहेरी शतक ठोकले आणि 309 चेंडूत 297 धावा केल्या होत्या. त्याने या खेळीत 51 चौकार, 3 षटकार लगावले होते. मात्र तो त्रिशतकापासून अवघ्या 3 धावा दूर राहिला.
आर्यवीर सेहवाग कोण आहे?
आर्यवीर सेहवाग हा भारताचा माजी स्फोटक सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवाग याचा थोरला मुलगा आहे. वयाच्या 17व्या वर्षी त्याने दिल्ली प्रीमियर लीग (DPL) 2025 मध्ये सेंट्रल दिल्ली किंग्जकडून खेळताना पदार्पण केलं.
आर्यवीरने दिल्ली प्रीमियर लीगमध्ये कशी कामगिरी केली?
आर्यवीरने 27 ऑगस्ट 2025 रोजी अरुण जेटली स्टेडियमवर ईस्ट दिल्ली रायडर्सविरुद्ध सेंट्रल दिल्ली किंग्जकडून पदार्पण केलं. त्याने 16 चेंडूत 22 धावा केल्या, ज्यात 4 चौकारांचा समावेश होता. त्याने अनुभवी गोलंदाज नवदीप सैनी आणि रौनक वाघेला यांच्याविरुद्ध प्रत्येकी दोन चौकार मारले.
आर्यवीरला DPL मध्ये खेळण्याची संधी कशी मिळाली?
यश धुल दुलीप ट्रॉफी खेळण्यासाठी गैरहजर असल्याने सेंट्रल दिल्ली किंग्जने आर्यवीरला सलामीवीर म्हणून संधी दिली. त्याला मागील सामन्यात क्षेत्ररक्षणात चांगली कामगिरी केल्यानंतर जोन्टी सिद्धू याने पुढील सामना खेळणार असल्याचं सांगितलं.
