मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण (Arakshan) देण्याची मागणी करत थेट मुंबईत धडक देणारे मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटलांनी आझाद मैदानावर (Azad Maidan) आमरण उपोषण आंदोलन सुरु केलं आहे. कपाळाला गुलाल लागल्याशिवाय आपण इथून उठणार नाही, असा शब्द जरांगे पाटलांनी आपल्या समर्थक मराठा बांधवांना दिला आहे. जरांगे पाटलांनी सरकारने सहकार्य केल्याबद्दल सरकारचे आभार मानले आहेत. तसेच आपण चर्चेसाठी तयार असल्याचंही जरांगेंनी म्हटलं आहे. मनोज जरांगेंसोबत जवळपास साडेसहा हजार गाड्या मुंबईत दाखल झाल्यात. सरकारने गोळ्या घातल्या तरी आपण मागे हटणार नाही. मात्र तुम्ही समाजाच्या नावाला गालबोट लागेल असं कोणतंही कृत्य करु नका असं आवाहन जरांगेंनी समर्थकांना केलं आहे.
शिवनेरी ते मुंबई…
गुरुवारी शिवजन्मभूमी जुन्नरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेल्या शिवसेने गडावरील माती कपाळी लावून जरांगेंनी मुंबईच्या दिशेने प्रवास सुरु केला. मजल दरमजल करत जरांगे आणि त्यांच्यासोबतचा हजारो गाड्यांचा ताफा पहाटेच्या सुमारास नवी मुंबईत पोहोचला. मुंबईमध्ये पोहोचल्यानंतर साडेनऊच्या सुमारास जरांगेंचा ताफा आझाद मैदानात पोहोचला. जरांगेंनी या वेळेस समर्थकांशी संवाद साधला.
डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय…
“सरकार आपल्याला सहकार्य करणार नव्हतं म्हणून घरोघरातून मराठ्यांनी मुंबईला जायचं आणि मुंबई जाम करायचे ठरवलं होतं. आता आपल्याला सरकारने सहकार्य केलं आहे. त्याबद्दल आपण सरकारचे कौतुक केले. त्यामुळे आता तुम्हालाही सहकार्य करायचे आहे. पुढील दोन तासांत मुंबई मोकळी करा,” असं आवाहन जरांगेंनी समर्थकांना केलं. तसेच “कोणीही जाळपोळ, दगडफेक करायची नाही. मराठ्यांची मान खाली जाईल असं एकही पाऊल कुणी उचलायचं नाही. डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय इथून उठायचं नाही. आपण समाजाला न्याय देण्यासाठी इथे आलो आहोत. आपण शिकलो नाही, आपण लोकांच्या बुद्धीने चाललो त्यामुळे सत्तर वर्षे वाटोळे झालं हे मराठ्यांनी विसरू नका,” असं जरांगे समर्थकांना उद्देशून केलेल्या भाषणात म्हणाले.
नक्की वाचा >> फक्त मराठा आरक्षण नाही तर जरांगेंनी केल्यात ‘या’ 6 मागण्या; एक मागणी धनंजय मुंडेंसंदर्भात
पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन
जरांगेंनी गाड्या घेऊन आलेल्या समर्थकांना पोलिसांना सहकार्य करत पार्किंगसाठी ठरवून दिलेल्या जागी गाड्या लावण्याचं आवाहन केलं. जरांगेंनी कोणथ्याही पद्धतीची हुल्लडबाजी होणार नाही याची खबरदारी घ्यावी असं समर्थकांना सांगितलं. तसेच शिस्तभंग करणाऱ्या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाही असा इशारच जरांगेंनी आंदोलनाच्या मंचावरुन दिला.
