गणपतीनिमित्त गावी निघालेल्या शिक्षकाचं अख्ख कुटुंब बेपत्ता असल्याचा प्रकार समोर आला होता. हिंगोलीमधील शिक्षक ज्ञानेश्वर चव्हाण (Dnyaneshwar Chavan) त्यांच्या पत्नी आणि दोन मुलांसह कारने प्रवास करत गावी निघाले होते. मात्र या सगळ्यांचा मोबाईल गेल्या 40 तासांपासून बंद होते. त्यामुळे नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली होती. परंतु ज्ञानेश्वर चव्हाण यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि दोन्ही मुलांचा शोध लागला असून सर्वजण सुखरुप आहेत.
तब्बल 40 तास बेपत्ता राहिल्यानंतर ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या कुटुंबीयांचा आज (28 ऑगस्ट) नऊ वाजून पन्नास मिनिटांनी त्यांचा शोध लागला. कालपासून बेपत्ता असलेल्या कुटुंबाचा अखेर संपर्क झाला आहे. गोंदवले महाराज मठ तालुका माण या ठिकाणी ते मुक्कामी होते. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी स्वत: व्हिडीओद्वारे याबाबत माहिती दिली. तसेच गेल्या 40 तासांत नेमकं काय काय घडलं?, हे देखील ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सांगितले आहे.
ज्ञानेश्वर चव्हाण व्हिडीओमध्ये काय म्हणाले?
ज्ञानेश्वर चव्हाण एक व्हिडीओ करत म्हणाले की, गणपतीच्या सुट्ट्या असल्यामुळे आम्ही रत्नागिरीहून गावाकडे जात असताना अचानक कुंभार्ली घाटाजवळ मुसळधार पाऊस असल्यामुळे आमचे मोबाईल भिजले. मोबाईल पाण्याने भिजल्यामुळे दोन्ही मोबाईल बंद झाले होते. दरम्यानच्या काळात काय करायचं काय नाही..असं म्हणत नेहमीप्रमाणे आम्ही गोंदवले महाराज मठ तालुका माण या ठिकाणी मुक्कामी थांबलो. यानंतर आम्ही इकडूनचं घरी जायचं ठरवलं होतं. यादरम्यान मोबाईल बंद असल्यामुळे आमचे सर्व नातेवाईक, मित्र आमची काळजी करत होते. कोणाशीच संपर्क न झाल्यामुळे सगळ्यांना त्रास झाला. त्यामुळे मी माफी मागतो. मी आणि माझे कुटुंब सुखरुप आहोत, अशी माहिती ज्ञानेश्वर चव्हाण यांनी दिली.
