लाखो कोकणवासिय गावी जाण्यासाठी निघाले आहेत. अवघ्या दोन दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. त्यामुळं राज्यातील विविध कानाकोपऱ्यातून लोक गावी जात आहेत. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येतेय. वरंध घाट आणि आंबेनळी घाट वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत. त्यामुळं गणेशोत्सव काळात प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा जवळचा रस्ता आता खुला होणार आहे. कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारे वरंध आणि आंबेनळी घाट हे दोन्ही घाटमार्ग वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत. त्यामुळे गणेशोत्सव काळात प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
वरंध आणि आंबेनळी हे दोन्ही घाट पावसाळ्यात धोकादायक ठरतात. या कारणास्तव हे दोन्ही रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले होते. तथापी दोन्ही मार्ग वाहतुकीसाठी खुले करावेत अशी मागणी प्रवाशांकडून होत होती. दोन्ही घाट मार्गाची दुरुस्ती आणि मजबुतीकरण करण्यात आले आहे. या संदर्भात महाड प्रांताधिकारी यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर रायगड जिल्हाधिकारी यांनी हा निर्णय घेतला आहे. मात्र अतिवृष्टीच्या काळात हा मार्ग बंद राहणार आहे. दक्षिण रायगड मधील अनेक लोक नोकरी व्यवसायानिमित्त पुणे, सातारा परिसरात राहतात त्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
मोदी एक्सप्रेस कोकणात दाखल
मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून मुंबईस्थित कोकणवासीयांसाठी दादर ते सिंधुदुर्ग जाणारी मोदी एक्सप्रेस सोडण्यात आली. ह्यावरही दोन विशेष गाड्या कोकणवासीयांसाठी सोडण्यात आल्या होत्या. मोदी एक्सप्रेसने निघालेले सर्व गणेशभक्त सिंधुदुर्गात दाखल झाले असून अतिशय सुखकर प्रवास झाल्याने सर्व कोकणवासीयांनी मंत्री नितेश राणे यांचे आभार मानले आहेत.
गणपतीला गावी जाण्यासाठी कोकणवासीयांचा एसटीला प्रचंड प्रतिसाद
येत्या 27 ऑगस्ट रोजी गणरायाचे आगमन होत असून गणपतीच्या स्वागतासाठी मुंबई, ठाणे व पालघर विभागातून कोकणात मूळगावी जाणाऱ्या कोकणवासीयांनी एसटी प्रवासाला पसंती दर्शवली आहे. त्यामुळे एसटीच्या 4,479 बस गट आरक्षणासह एकूण 5,103 जादा बस आतापर्यंत भरल्या आहेत. एसटी महामंडळाने यावर्षी 23 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान 5,200 जादा एसटी बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
