जगावर असणारी संकटं एकामागून एक धडकी भरवत असतानाच यात आणखी एका संकटाची भर पडली. शुक्रवारी 8.0 तीव्रतेच्या महाभूकंपाने अमेरिका हादरली. अतिप्रचंड तीव्रतेच्या या भूकंपानंतर सर्वत्र पळापळ, नागरिकांच्या किंकाळ्या असंच भेदरवणारं दृश्य पाहायला मिळालं.
प्राथमिक स्वरुपात समोर आलेल्या माहितीनुसार हा भूकंप 8.0 तीव्रतेचा असून प्रामुख्यानं दक्षिण अमेरिकेत त्याचा अधिक प्रभाव दिसून आला. गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि जपानचा समुद्र किनाऱ्याला भूकंपाचे धक्के बसत आहेत. त्यातच आता या भूकंपानंही जगाला भयग्रस्त केलं आहे.
रशिया आणि जपान नंतर आता अमेरिकेवर निसर्ग कोपला आहे. अमेरिकेत महाभूकंप झाल्याचं समोर आलं असून दक्षिण अमेरिकेत भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. ड्रेक पॅसेज या भागात भूकंपाचे केंद्रबिंदू असल्याची माहिती समोर येत आहे. ड्रॅक पॅसेज हा एक खोल आणि अरूंद समुद्री मार्ग आहे. हा मार्ग दक्षिण आणि पश्चिम अटलांटिक महासागरांना आणि दक्षिण-पूर्व प्रशांत महासागराला जोडतो.
दक्षिण अमेरिकेत आलेल्या या 7.5 ते 8.0 रिश्टर स्केलच्या भूकंपानंतर सागरी विज्ञान सेवा विभागानं चिलीच्या अंटार्क्टीक क्षेत्रासाठी त्सुनामीचा इशारा जारी केला आहे. प्राथमिक स्वरुपात भूकंपाची तीव्रता 8.0 रिश्टर स्केल असल्याचं सांगण्यात आलं. मात्र संयुक्त राज्य भूवैज्ञानिक सर्वेक्षण (USGS) विभागानं हा आकडा 7.5 रिश्टर स्केल असल्याचं सांगितलं. या भूकंपाची खोली भूपृष्ठापासून 11 किमी अंतरापर्यंत असून, सर्वात मोठा हादरा ‘ड्रेक पॅसेज’ या जगातील सर्वात घतक सागरी भागात जाणवला.
भारतीय प्रमाण वेळेनुसार हा भूकंप सकाळी 7 वाजून 46 मिनिटांनी आला. संशोधक आणि निरीक्षणकर्त्यांच्या माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता पाहता त्यामुळं सागरी परिघामध्ये अनेक हालचाली होत त्यातून त्सुनामी किंवा तत्सम परिस्थिती नाकारता येत नाही. सध्यातरी या भूकंपात कोणतीही जीवित हानी झाल्याचं वृत्त नसलं तरीही ‘ड्रेक पॅसेज’मध्ये एकाएकी होणाऱ्या या उलथापालथीमुळं जागतिक स्तरावर ही चिंतेची बाब ठरत आहे.
