राज्यात सध्या मुसळधार पावसानं (Heavy Rain) धुमाकूळ घातला आहे. अनेक भागात या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाल्यांना पूर आले आहेत. धरणांच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. उजनी धरणातून तब्बल 1,41,600 क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे, भीमा व नीरा नदीचा संगम नीरा नरसिंगपूर येथे होऊन हे सर्व पाणी पंढरपूरला चंद्रभागेत येत असल्याने पंढरपुरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीमुळे आसपासच्या गावांमध्ये प्रशासनाने सतर्कतेचा इशारा जारी केला आहे.
मांजरा धरण 98 % भरलं, मोठा विसर्ग सुरु
लातूर शहरासह जिल्ह्यातील नागरिकांना पाणीपुरवठा करणारा बीड जिल्ह्यातील धनेगाव येथील मांजरा प्रकल्प तब्बल 98 टक्के क्षमतेने भरला आहे. सततचा पाऊस आणि कॅचमेंट क्षेत्रातील वाढता येवा यामुळे धरण जलाशयात मोठ्या प्रमाणावर पाण्याची भर पडली आहे. त्यामुळे पाण्याचा दबाव कमी करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने धरणाचे दरवाजे नियंत्रित पद्धतीने उघडण्याचा निर्णय घेतला आहे. आज सकाळी सुमारे 8 च्या सुमारास मांजरा प्रकल्पाचे दोन दरवाजे 0.25 मीटरने उघडण्यात आले. सध्या प्रकल्पाचे एकूण 4 दरवाजे उघडे असून, या दरवाज्यांतून 3494.28 क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
हा पाण्याचा प्रवाह थेट मांजरा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. सध्या प्रकल्पातून प्रति सेकंद 98,958 लिटर पाणी नदीपात्रात विसर्ग होत आहे.
लातूरच्या पाणीपुरवठ्यासाठी दिलासा
मांजरा प्रकल्प लातूर शहराचा मुख्य पाणीपुरवठा स्त्रोत आहे. धरण जलाशय भरल्यामुळे आगामी काही महिन्यांसाठी लातूरकरांना पाणीपुरवठ्याबाबत दिलासा मिळणार आहे. दरवर्षी पावसाच्या कमतरतेमुळे या भागात पाण्याची टंचाई जाणवते. मात्र, यंदा धरण भरल्याने प्रशासनाला शहरासह आसपासच्या गावांचा पाणीपुरवठा नियमित करण्यास मदत होणार आहे.
उजनी व वीर धरणातील परिस्थिती
दरम्यान, जिल्ह्यातील पाणीसाठ्याबाबत दिलासा मिळत असतानाच राज्यातील इतर धरणांमधूनही पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. उजनी धरणातून तब्बल 1,41,600 क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. याउलट, वीर धरणाचा विसर्ग मात्र 16,000 क्युसेक्सपर्यंत घटवण्यात आला आहे. या बदलांचा परिणाम नदीकाठच्या गावांवर होणार असून, प्रशासनाकडून सतत निरीक्षण ठेवले जात आहे. सध्या चंद्रभागेच्या पात्रात केवळ एक लाख दहा हजार क्युसेक विसर्गाणे पाणी असून दुपारी त्यात वाढ होऊन 1 लाख 70 हजार क्युसेक पर्यंत विसर्ग पोहोचणार आहे
उजनी व वीर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पंढरपूर शहरामध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून चंद्रभागा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. चंद्रभागा पात्रा नजीक असणाऱ्या अंबिका नगर आणि व्यास नारायण वसाहतीमध्ये पाणी घुसल्याने शंभर कुटुंबांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. कालपासून उजनी व वीर धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येऊ लागल्याने शहरातील नदीकाठच्या भागात रात्री उशिरा पाणी शिरण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर नगरपालिका प्रशासनाने रात्रीतून जवळपास शंभर कुटुंबांचे स्थलांतर सुरक्षित स्थळी केलेली आहे. भीमा व नीरा नदीचा संगम नीरा नरसिंगपूर येथे होऊन हे सर्व पाणी पंढरपूरला चंद्रभागेत येत असल्याने पंढरपुरात पूरस्थिती निर्माण झाली आहे.
दिंडोरी तालुक्यात पावसाची दमदार हजेरी
सलग तीन दिवसापासून नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात सुरू असलेल्या पावसांच्या संततधारेमुळे तालुक्यातील सर्वच धरणांच्या पाणी साठ्यात वाढ झाली असून, तालुक्यातील सर्वात मोठे करंजवण धरण ९४% भरले आहे.. करंजवण धरणातून कादवा नदीत ७०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे..करंजवण धरण भरल्याने येवला, मनमाड यासह निफाड नाशिकच्या पूर्व भागाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.करंजवणसह पालखेड धरण ६२.७९%, पुणेगाव धरण ८७.२६% भरले तर ओझरखेड, वाघाड व तिसगाव धरणाने शंभरी गाठली आहे.. नाशिकच्या गोदावरी नदीची पुरस्थिती सलग दुसऱ्या दिवशीही कायम आहे, गोदा काठावरील मंदिरांना पाण्याने वेध दिला असून दुतोंडया मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आले आहे, रात्री पासून पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात आलीं असून 7 हजार 372 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग गंगापुर धरणातून केला जात आहे.
नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
चंद्रभागेची इशारा पातळी 443 मीटर इतकी असून सध्या नदीतून ४४३.१८ मीटर एवढी पाणी पातळी झाली आहे. पंढरपूर शहराची धोका पातळी 445 मीटर असून पाण्यात अजून वाढ झाल्यास शहराला महापुराचा धोका उद्भवणार आहे. याचबरोबर पंढरपूर तालुक्यातील 42 नदीकाठच्या गावांनाही प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला असून शेकडो हेक्टर वरची पिके सध्या पाण्याखाली गेलेली आहेत
मांजरा नदीकाठच्या गावातील नागरिकांनी नदीपात्रात अनावश्यक हालचाली टाळाव्यात, शेतकऱ्यांनी नदीकाठच्या शेतांमध्ये जाऊ नये, जनावरांना नदीकाठाजवळ न ठेवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अचानक पाण्याचा विसर्ग वाढू शकतो, त्यामुळे कोणतीही बेपर्वाई न करता सर्वांनी सतर्क राहावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
