मुंबईसह (Mumbai Rains) उपनगरात मुसळधार पाऊस (Rain Updates LIVE) सुरू आहे. परेल हिंदमाता परिसरात पाणी साचलंय. ठाणे, नवी मुंबईतही जोरदार पाऊस कोसळतेय..पश्चिम उपनगरात अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, सांताक्रूझ, वांद्रे या सर्व परिसरात पाऊस सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय. मध्य रेल्वेची वाहतूक 40 मिनिटं उशिरानं आहे, तर हार्बर रेल्वे 15 ते 20 मिनिटं उशिरानं आहे, तर पश्चिम रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिरानं आहे.
मुंबई उपनगरांत मागील 24 तासांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. विक्रोळी परिसरात सर्वाधिक 255.5 मिमी पावसाची नोंद करण्यात आल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे. सोबतच, भायखळा, सांताक्रुज, जुहू, वांद्रे परिसरात देखील अतिवृष्टी झाल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. त्यासोबतच येत्या 24 तासांत पावसाचा जोर कायम राहण्याचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे.
पावसामुळे मुंबईतील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शक्य असल्यास खासगी कार्यालयांना सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होम देण्याच्या सूचना महापालिकेकडून देण्यात आल्या आहेत. तसेच, गरज नसल्यास घराबाहेर पडू नका, असं आवाहनही प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात येत आहे.
मुंबईत पुन्हा 26 जुलै…?
मुंबईची मिठी नदी कोपली की, मुंबईत हाहाकार माजतो. याचा प्रत्यय मुंबईकरांनी आणि लगतच्या उपनगरांनी 26 जुलैच्या पावसात घेतला आहे. सध्या धोधो कोसळणाऱ्या पावसामुळे मिठी नदी दुथडी भरून वाहत आहे. सध्या मिठी नदी 4.7 मीटरवरुन वाहत आहे. पण, मुसळधार पावसामुळे प्रशासन अलर्ट मोडवर असून मिठी नदीच्या लगतच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात येत आहे. तसेच, इतर भागांतील नागरिकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. असाच पाऊस सुरू राहिल्यास मिठी नदीच्या किनाऱ्यावरील कुर्ला, वांद्र्याच्या किनारी भागांत पाणी साचण्याची शक्यता आहे.
डोंगराळ भागातील नागरिकांचं स्थलांतर
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर पालिका अलर्ट मोडवर आली आहे. मुंबईतील डोंगराळ भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. तर, भांडुप सूर्यनगरमधील नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याची शक्यता आहे, त्यामुळे डोंगराळ भागातील नागरिकांचं स्थलांतर केलं जात आहे.
मुंबईवर काळ्याकुट्ट ढगांची गर्दी
मुंबईत पहाटेपासूनच पावसाची कोसळधार पाहायला मिळतेय. मुंबईची तुंबई झाली आहे. अनेक सखल भागांत पाणी साचलं आहे. पाऊस असाच सुरू राहिली तर मुंबईची मिठी नदी धोक्याची पातळी गाठू शकते. सकाळपासूनच मुंबईवर काळ्याकुट्ट ढगांनी गर्दी केली आहे. काळे ढग मुंबईवर धोधो कोसळत आहेत. सकाळी 9 आणि 10 वाजताही रस्त्यांवरच्या गाड्यांच्या हेडलाईट्स सुरू करुन प्रवास करावा लागत आहे. मुंबईत अगदी काळाकुट्ट अंधार दाटला आहे. सकाळी मेट्रो, लोकलमधल्या लाईट्स सुरू करण्यात आल्या आहेत.
