मुंबईतील मुसळधार पावसाचा फटका लोकल सेवेला बसला असून ठाणे कडून मुंबई सीएसटीकडे जाणाऱ्या सर्व ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे सेवा सुरळरीत करण्यात आल्यावर प्रशासनाकडून पुढील सूचना देण्यात येतील. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी लोकल सेवा ठप्प झाल्यामुळे फलाटावर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी असल्याचे पहायला मिळत आहे. फलाटावर या संदर्भात रेल्वेप्रशासनाकडून सूचना करण्यात येत आहे.
मुंबईत पडतत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं आहे. त्यामुळे सकाळपासूनच रेल्वे सेवा ठप्प झाल्या आहेत. अप मार्गाने येणाऱ्या गाड्या या ठाण्यापर्यंतच सुरू आहेत. ठाणे ते मुंबई सीएसटीकडे जाणाऱ्या गाड्या या रद्द करण्यात आल्याचं सर्व स्टेशन्सवर अनाउंसमेंट केली जात आहे.
Thane Rain Update : प्रवासी ठाण्यात अडकले
लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाल्याने अनेक लोक हे ठाणे स्टेशनपर्यंत थांबले आहेत. काही एक्सप्रेस गाड्या सुद्धा रद्द झाल्या आहेत, तर काही उशिराने आहेत. त्यामुळे अनेक प्रवासी ठाणे स्टेशनवर बसून आहेत. शिवाय लोकल ठाणे स्टेशनवर थांबले आहेत. तिथे सुद्धा तास दोन तासापासून प्रवासी लोकल सेवा पूर्ववत होण्याची वाट बघत आहेत. मात्र पावसाचा जोर अजूनही कमी झालेला नाही. त्यामुळे प्रवाशांचा मनस्ताप पाहायला मिळतोय.
Mumbai Local Train Update : अनेक ठिकाणी पाणी साचलं
मुंबईतील कुर्ल्यातील एलबीएस रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. रस्त्याला नदीचे स्वरुप आल्याचं चित्र आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूने पाणी साचल्याने वाहतूकही बंद झाली आहे. मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गाला लगत असलेल्या कलिना जंक्शनमध्ये पाणी साचलं आहे. त्यामुळे अनेक गाड्या साचलेल्या पाण्यात अडकून बंद पडल्या.
मिठी नदीची पाणी पातळी वाढली, 350 जणांचे स्थलांतर
बृहन्मुंबई महानगरपालिका परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मिठी नदीची पातळी 3.9 मीटर इतकी वाढली होती. ही बाब लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून क्रांतीनगर, कुर्ला या परिसरातील सखल भागातील सुमारे 350 नागरिकांचे स्थलांतर हे तात्पुरत्या निवाऱ्याचे ठिकाण असणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मगनदास मथुराम मनपा शाळेत करण्यात आले आहे. या ठिकाणी सदर नागरिकांच्या खानपानाची व्यवस्था बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात आली आहे.
मुसळधार पावसाने कालपासून राज्याला अक्षरशः झोडपून काढलंय. मुंबईसह ठाणे, कल्याण डोंबिवली, वसई विरार, नवी मुंबई पनवेलला पावसाने धुवून काढलंय. कोकणातही पूरस्थिती आहे. पावसाने पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातही जोरदार धुलाई केलीय. त्यामुळे जागोजागी पूरस्थिती निर्माण झालीय. पावसाच्या तडाख्यामुळे मुंबईपासून अगदी खेड्यापर्यंत जनसामान्यांचे अक्षरशः हाल सुरू आहेत.
