मुंबईत सोमवारपासून सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे मंगळवारी (19 ऑगस्ट) पहाटेच्या मिठी नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे, ज्यामुळे सखल भागातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. एल वॉर्डमधील नागरी अधिकारी, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) पथकांसह, परिस्थिती हाताळण्यासाठी क्रांती नगरजवळील बाधित ठिकाणी पोहोचले आहेत. सध्या नागरिकांचं स्थलांतर केलं जात आहे. रहिवाशांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी 140 हून अधिक झोपडपट्ट्यांचे तात्काळ स्थलांतर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मिठी नदीची पातळी 3.8 मीटर इतकी झाली आहे.
मंगळवारी सकाळी मिठी नदीच्या पाणी पातळीने 3.20 मीटर ओलांडताच, कपाडिया नगरमधील जवळच्या झोपडपट्टीतील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. पुराचा धोका असल्याने, स्थानिकांनी स्वतःहून स्थलांतर करण्यास सुरुवात केली होती. काहींनी नातेवाईकांकडे आश्रय घेतला, तर काहींनी उंच मजल्यांवर स्थलांतर केले आहे.
एल वॉर्डचे सहाय्यक आयुक्त धनाजी हिर्लेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर एनडीआरएफ आणि मुंबई अग्निशमन दलाला तात्काळ तैनात करण्यात आले. सध्या नागरिकांना जवळच्या महापालिकेच्या शाळेत हलवत आहोत, असंही ते म्हणाले. हिर्लेकर घटनास्थळी स्वतःहून स्थलांतर प्रक्रियेचे निरीक्षण करण्यासाठी आणि आपत्कालीन पथकांशी समन्वय साधण्यासाठी उपस्थित होते.
जवळपास 200 ते 300 झोपडपट्ट्या बाधित भागात आहेत, त्यामुळे तातडीने खबरदारीची कारवाई करणे आवश्यक आहे. मुसळधार पाऊस कोसळत असल्याने पुराचा धोका निर्माण झाला आहे. अधिकारी अलर्टवर आहेत, पाण्याच्या पातळीचे बारकाईने निरीक्षण करत आहेत आणि गरज पडल्यास अधिक स्थलांतर करण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
मुसळधार पावसात बचाव कार्य सुरू असताना नागरी कर्मचाऱ्यांनी लाऊडस्पीकरवरून घोषणा दिल्या जात आहेत. रहिवाशांना शांत राहण्याचे आवाहन केले जात आहे. आतापर्यंत 300 नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मिठी नदी परिसराची पाहणी केली. तसेच, अधिकाऱ्यांना नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याच्या सूचना केल्या आहेत.
