मुबईत सलग दुस-या दिवशीची पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला. सर्वाधिक फटका हा लोकल प्रवाशांना बसला आहे. मध्यरात्रीपासून मुंबईत पावसानं रौद्ररूप धारण केलं आणि मुंबईची ही लाईफलाईन ठप्प झाली आहे. ठाणे ते CSMT नंतर आता चर्चंगेट ते बोरिवली लोकल रेल्वे सेवा पूर्णपणे बंद झाली आहे.
लोकलच्या ट्रॅकवर तुडूंब पाणी भरल्यामुळे नोकरी निमित्ताने घराबाहेर पडलेल्यांचे प्रचंड हाल झाले आहेत. सायन ते माटुंगा रेल्वे स्थानकातील रेल्वे ट्रॅक पूर्णपणे पाण्याखाली गेल. त्यामुळे मध्य रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले. सकाळी मध्य रेल्वेच्या लोकल तब्बल 25 ते 30 मिनिटं उशिरानं धावत होत्या. रेल्वे ट्रॅकवरील पाणी वाढल्याने मध्य रेल्वेची ठाणे ते CSMT लोकल सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली.
तुफान पावसाचा फटका पश्चिम रेल्वेला देखील बसला आहे. माटुंगा दादर दरम्यान रेल्वे रुळावर पाणीच पाणी झाले आहे. पश्चिम रेल्वेने पुढील सुचनेपर्यंत चर्चंगेट ते बोरिवली स्लो ट्रेन सेवा बंद केली आहे. यामुळे नोकरी निमित्ताने मुंबईत आलेले हजारो प्रवासी आहे तिथेच अडकले आहेत.
दरम्यान, एकीकडे पावसाने मुंबईकरांची त्रेधातिरपीट होत असतानाच मुंबईकरांना मोनो आणि मेट्रो रेल्वेने दिलासा दिला आहे. मेट्रो-मोनो रेल्वे सुरळीत सुरू आहे. मेट्रो-मोनोमुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. मुंबई मध्य-हार्बर रेल्वे ठप्प झाली असताना मुंबईकरांचा मेट्रो-मोनो रेल्वेने प्रवास करत आहेत. मुसळधार पावसामुळे रस्त्यांना तलावाचं स्वरूप आलं आहे. ठाणे,डोंबिवली, कल्याण आणि नवी मुंबईत देखील पावसाचं थैमान पाहायला मिळालं. यामुळे रस्त्यांवर पाणी साचले आहे.
