15 ऑगस्ट, भारताचा स्वातंत्र्यदिन, पण हा दिवस केवळ स्वातंत्र्याचा उत्सव नसून भारतीय क्रिकेटसाठीही अनेक आठवणी जपून ठेवतो. गेल्या अनेक दशकांत या तारखेला टीम इंडियाने एकूण सहा आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, त्यापैकी दोन सामन्यांत दमदार विजय मिळवत देशाचा तिरंगा उंचावला आहे.
लॉर्ड्सवर इंग्लंडचा पराभव
15 ऑगस्ट 2021 रोजी इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानावरचा तो ऐतिहासिक दिवस. भारत पहिल्यांदाच स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी कसोटी सामना खेळत होता आणि इंग्लंडला त्यांच्या घरच्या मैदानावर हरवणे सोपे नव्हते. पहिल्या डावानंतर भारत अडचणीत होता, पण जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या दोघांनी 70 धावांची अप्रतिम भागीदारी करत सामन्याचा चेहरामोहराच बदलला. या खेळीच्या जोरावर भारताने इंग्लंडला तब्बल 151 धावांनी हरवले आणि स्वातंत्र्यदिनाचा आनंद दुप्पट केला.
वेस्ट इंडिजवर मात
दुसरा आठवणीतला विजय म्हणजे 2019 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध पोर्ट ऑफ स्पेन येथे मिळाला. सामना 14 ऑगस्टला सुरू झाला होता, पण पावसामुळे तो 15 ऑगस्टला गेला. 256 धावांचा पाठलाग करताना कर्णधार विराट कोहलीने नाबाद 114 धावांची खेळी साकारली. त्याच्या या शानदार खेळीमुळे भारताने सामना जिंकून मालिकाही खिशात घातली.
पहिला सामना आणि एकूण संघाची कामगिरी
15 ऑगस्टला खेळलेला भारताचा पहिला सामना 1952 साली इंग्लंडविरुद्धचा टेस्ट होता. तो पावसामुळे बरोबरीत सुटला. इंग्लंडने पहिल्या डावात 326 धावा केल्या होत्या, तर भारत फक्त 98 धावांवर गारद झाला होता.
आत्तापर्यंत भारताने स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी सहा सामने खेळले आहेत. त्यापैकी दोन विजय, तीन पराभव आणि एक सामना ड्रॉ. पहिला सामना 1952 मध्ये झाला, तर सर्वात अलीकडचा संस्मरणीय विजय 2021 मध्ये इंग्लंडच्या लॉर्ड्सवर नोंदवला गेला.
