Search
Close this search box.

दुकान मालक होण्याची संधी… MHADA च्या गाळ्यांसाठी लॉटरी! किंमत 23 लाखांपासून; अर्ज कसा करायचा पाहा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

तुम्ही एखाद्या चांगल्या गाळ्याच्या शोधात आहात का? गुंतवणूक म्हणून किंवा स्वत:ला वापरासाठी तुम्ही दुकान सुरु करण्याच्या दृष्टीने गाळा शोधत असाल तर म्हाडा तुमची मदत करु शकतं. म्हाडाच्या मुंबई मंडळाने 149 दुकानांच्या ई लिलावासाठी नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेस मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. इच्छुकांना 25 ऑगस्टपर्यंत अनामत रक्कमेसह अर्ज करता येणार असून 29 ऑगस्ट रोजी ई-लिलावाचा निकाल जाहीर होईल.

किती कमाई अपेक्षित?
या ई लिलावात मुंबईतील 17 ठिकाणच्या 149 दुकानांचा समावेश असून मागील ई-लिलावात विकल्या न गेलेल्या 124 दुकानांचा त्यात समावेश आहे. मुंबई मंडळाने या दुकानांसाठी 23 लाख रुपयांपासून थेट 12 कोटी रुपयांपर्यंतची बोली निश्चित केली. या बोलीपेक्षा सर्वाधिक बोली लावणारा अर्जदार विजेता ठरला. या ई-लिलावातून मुंबई मंडळाला 229 कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळण्याची शक्यता आहे.

ऑनलाइन बोली कधी लावता येणार?
मागील वर्षी मंडाळने 173 दुकानांचा ई लिलाव केला. मात्र या ई-लिलावात केवळ 49 दुकाने विकली गेली आणि 124 दुकाने रिक्त राहिली. त्यामुळे ही रिक्त 124 दुकाने व नव्या 25 अशा एकूण 149 दुकानांचा ई-लिलाव करण्याचा निर्णय घेत मुंबई मंडळाने मंगळवारपासून (12 ऑगस्ट) नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृतीस सुरुवात केली आहे. इच्छुकांना 25 ऑगस्ट रोजी रात्री 11.59 पर्यंत अर्ज भरता येईल. तर ऑनलाइन पद्धतीने बोली लावण्यास 28 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजल्यापासून सुरुवात होईल. त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता बोली लावण्याची मुदत संपुष्टात येईल.

कोकण मंडळाच्या 5285 घरांसाठी आता 18 सप्टेंबरला सोडत
याचप्रमाणे म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 5285 घरांसह 77 भूखंडाच्या सोडतीसाठी नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार अनामत रक्कमेचा भरणा करून अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत गुरुवार, 14 ऑगस्टला संपुष्टात येईल. मात्र त्याआधीच मंडळाने नोंदणी, अर्जविक्री, स्वीकृतीला 15 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. आता इच्छुकांना 28 ऑगस्टपर्यंत अनामत रकमेसह अर्ज भरता येईल. नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेला मुदतवाढ दिल्याने आता 3 सप्टेंबर रोजी काढण्यात येणारी सोडतही आता 18 सप्टेंबरला सोडत काढली जाईल. कोकण मंडळाने 20 टक्के सर्वसमावेशक योजनेतील 565 घरे, 15 टक्के एकात्मिक योजनेतील 3002 घरे, म्हाडा योजनेतील 1677 घरे, म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजनेअंतर्गत असलेली 41 घरे अशा एकूण 5285 घरांसाठी 14 जुलैपासून नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेस सुरुवात केली आहे.

77 भूखंडाचाही समावेश
कोकण मंडळाच्या या सोडतीत 77 भूखंडाचीही समावेश आहे. सोडतीच्या वेळापत्रकानुसार 13 ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम मुदत होती. तर 14 ऑगस्टला अनामत रकमेसह अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत होती. एकात्मिक योजनेतील आणि म्हाडा योजनेतील घरांना प्रतिसाद मिळाला नसला तरी सोडतीतील 20 टक्के योजनेतील 565 घरांना मात्र चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 565 घरांसाठी अनामत रक्कमेसह 40 हजार 240 अर्ज सादर झाले आहेत. खासगी विकासकांच्या प्रकल्पातील ही घरे असून या घरांना नेहमीच चांगला प्रतिसाद मिळतो. त्यानुसार यंदाही अर्जदारांनी चांगली पसंती दिली.

admin
Author: admin

और पढ़ें