आतापर्यंत तुम्ही डाकू, गुंड किंवा दरोडेखोरांचा पोलीस चकमकीत मृत्यू झाल्याचं ऐकलं असेल. मात्र झारखंडमधील गोड्डा जिल्ह्यामध्ये पोलिसांनी चक्क एका भाजपाच्या माजी नेत्याचा चकमकीमध्ये खात्मा केला आहे. लालमटिया येथील डकैता गावात राहणारा पूर्वाश्रमीचा भाजपा नेता सूर्यनारायण उर्फ हंसदाचा खात्मा केला. सोमवारी सकाळी ओअरीजोर पोलीस ठाण्याच्या जोलोकुंडी आणि राहरबारिया टेकड्यांच्या पायथ्याजवळून पोलिसांनी सूर्यनारायणचा मृतदेह ताब्यात घेतलाय. विशेष म्हणजे कालच या व्यक्तीला अटक झाली होती.
काल अटक अन् लगेच चकमकीत ठार
सूर्यनारायणची आई निलमणी मुर्मू यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल म्हणजेच रविवारी पोलिसांनी सूर्याला देवघर येथील मोहनपूर नवडीह येथील त्याच्या मावशीच्या घरातून अटक केली. त्यानंतर रात्रीच सूर्यनारायण आणि पोलिसांची चकमक घडल्याचे सांगितले जात आहे. आज, सोमवारी सकाळी, शेकडो पोलिस कर्मचाऱ्यांनी सूर्यनारायणचा मृतदेह घटनास्थळावरून गोड्डा येथील रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी नेला. सध्या पोलिस या प्रकरणाबद्दल कोणतीही माहिती देत नसून सूर्यनारायणची आई निलमणी मुर्मू आणि पत्नी शीला मुर्मू दोघेही सध्या रुग्णालयात त्याचं अत्यंदर्शन मिळेल या अपेक्षिने पोहोचल्या आहेत. सूर्यनारायणचा मृतदेह घेऊन जात असतानाच त्याच्या आईने पोलिसांची गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तिला बाजूला करत मृतदेह रुग्णालयात नेला.
अनेक गुन्हे दाखल
जानेवारीपासून सूर्यनारायणविरुद्ध गोड्डा आणि साहिबगंज जिल्ह्यात एकूण तीन गुन्हे दाखल झालेत. यामध्ये प्रामुख्याने ईसीएल खाण परिसरात 30 ते 40 राउंड्स गोळीबार, साहिबगंजमधील पेट्रोल पंपाजवळ जाळपोळ अशा घटनांचा समावेश आहे. सूर्यनारायण सन 2000 च्या सुमारास या परिसरातील एक कुप्रसिद्ध गुंड होता. तो अपहरण, खून, दरोडा इत्यादी 50 हून अधिक प्रकरणांमध्ये अप्रत्यक्षपणे सहभागी होता.
राजकारणातही आजमावलेला हात
2009 नंतर सूर्यनारायण मुख्य प्रवाहातील राजकारणात सहभागी झाला. सूर्यनारायण प्रथम जेव्हीएम, नंतर भाजप आणि नंतर जेएलकेएममध्ये सामील झाला. त्याने बोरियो विधानसभा मतदारसंघातून दोनदा निवडणूक लढवली, परंतु दोन्ही वेळा त्याला निराशा सहन करावी लागली. सूर्यनारायण आदिवासींच्या हिताबद्दल आपल्या भाषाणामधून बोलायचा.
अटकेसाठी एसआयटी स्थापन करण्यात आलेली
गोड्डा पोलिसांनी सूर्यनारायणविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांच्या अटकेसाठी एसआयटी स्थापन केली होती. गोड्डाचे एसडीपीओ अशोक रविदास यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या अटकेसाठी छापे टाकण्यात येत होते. अखेर काल रात्री झालेल्या चकमकीमध्ये सूर्यनारायणचा मृत्यू झाला.
