शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे इंडिया आघाडीच्या बैठकीसह आघाडीतील विविध भेटीगाठी करण्यासाठी दिल्लीमध्ये पोहोचले आहेत. त्यांच्या दौऱ्याचा आजचा (6 ऑगस्ट) दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची निवासस्थानी भेट घेतली. आज दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवरती भाष्य केलं. दुसरीकडे इंडिया आघाडीची आज लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच समोरासमोरच बैठक होत आहे. यापूर्वी झालेली बैठक ऑनलाइन स्वरूपात होती. त्यामुळे या बैठकीमध्ये राज ठाकरे यांच्या अनुषंगाने चर्चा होणार का? याची सर्वाधिक उत्सुकता आहे. इंडिया आघाडीची बैठक राहुल गांधी यांच्या निवासस्थानी होत आहे.
दुसऱ्यांनी चर्चा करण्याची गरज नाही
या संदर्भात उद्धव ठाकरे यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी अवघ्या एका मुद्द्यांमध्ये उत्तर देत कोणतेही भाष्य केलं नाही. ते म्हणाले की आम्ही दोघे भाऊ एकत्र आलो आहोत. या मुद्द्यावर दुसऱ्यांनी चर्चा करण्याची गरज नाही आणि आमच्यासाठी समर्थ आहोत, असे राज यांच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी थेट भाष्य केलं. याच अनुषंगाने आणखी एक प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी या संदर्भात मुंबईत चर्चा करु म्हणाले. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी मोदींच्या परराष्ट्र धोरणांवरून हल्लाबोल केला. उपराष्ट्रपती निवडणुकीवरूनही उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला. ते म्हणाले की उपराष्ट्रपतींना तडकाफडकी का काढण्यात आलं? ते सध्या आहे तरी कुठं याची पहिल्यांदा चर्चा झाली पाहिजे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. आज राहुल गांधी यांच्याकडून स्नेहभोजनासाठी निमंत्रण असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
देशात अघोषित सीएए-एनआरसी लागू झालं आहे का?
बिहारमध्ये सुरु असलेल्या मतदारयाद्या सुधारणावरूनही उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला. देशात अघोषित सीएए-एनआरसी लागू झालं आहे का? अशी विचारणा त्यांनी केली. ते म्हणाले की, तुम्ही तुमची ओळख पटवून द्या, असे आयोगाकडून सांगितलं जात आहे. सीएए-एनआरसी अशाच पद्धतीने लागू करण्यात येणार होतं, असे ते म्हणाले. स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर होणार नसल्याने उद्धव ठाकरे यांनी तोफ डागली. मग निवडणूक घेता कशाला? अशी विचारणा त्यांनी केली. मत कुठं जातंय हे कळलं पाहिजे, असे ते म्हणाले.
