सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील लखन माने या युवा शेतकऱ्याने आपल्या शेतात साचलेल्या पाण्यात बसून राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांना आर्त हाक दिली आहे. “आम्हाला पंचनामा नको, नुकसानभरपाई नको… फक्त हमीभाव द्या,” अशी मागणी या युवा शेतकऱ्याने कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांना केली आहे.
काल (6 ऑगस्ट) झालेल्या मुसळधार पावसामुळे (Rain) सोलापूर जिल्ह्यात शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. लखन माने यांच्या 2 एकरवरील टोमॅटो पिकाच्या बागेत पाणी साचले आहे. अंदाजे 10 ते 12 लाख रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. या परिस्थितीत हतबल झालेल्या माने यांनी शासनाकडे आपली व्यथा मांडली आहे.
आम्हाला पंचनामा, नुकसानभरपाई नको, हमीभाव द्या
लखन माने यांनी पावसाळी अधिवेशनावरही नाराजी व्यक्त केली. “कोणी रम्मी खेळतोय, कोणी मारामारी करतोय, कोणाचा बार आहे यावरच चर्चा होते, पण आमच्या शेतीची कोणालाही फिकीर नाही,” असा संताप देखील त्यांनी व्यक्त केलाय. राजकारणात सत्ताधारी आणि विरोधक केवळ एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात व्यस्त आहेत, पण शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूला पडल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. आम्हाला पंचनामे नकोत, नुकसानभरपाई नको तर हमीभाव द्या, अशी मागणी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर कृषी खात्याने, तसेच राज्य सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
सोलापूरला पावसाचा कहर
सोलापूर शहर व जिल्ह्यात काल मुसळधार पावसाने हजेरी लावली. शहरात सरासरी 72.7 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली असून, काही भागांत जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले. बाळे परिसरात संतोषनगर व तोडकर वस्ती भागातील तब्बल 80 घरे पाण्याखाली गेली. पाणी घरात शिरल्यामुळे अनेक कुटुंबांना रात्री घराबाहेर सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा लागला. घरातील साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेळगी येथे 89.8 मिमी इतका मुसळधार पाऊस झाला. त्या खालोखाल सोलापुरात 82.5 मिमी एवढा पाऊस झाला. तिन्हे महसूल मंडल क्षेत्रात 67 मिमी पाऊस झाला. दक्षिण सोलापूरमध्ये 36.6 मिमी, मोहोळमध्ये 38.4 मिमी पाऊस झाला. सांगोल्यात 29.5, अक्कलकोटमध्ये 25.2, बार्शीत 24.3, पंढरपुरात 20.9, माळशिरसमध्ये 20.5, माढा 18.4 आणि मंगळवेढा 16 याप्रमाणे पावसाची नोंद झाली आहे.
