राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आज आणि उद्या, (गुरूवार आणि शुक्रवारी) पावसाचा जोर काहीसा वाढणार आहे, अशातच मागील काही दिवसाच्या विश्रांती नंतर आज पहाटेपासून पुन्हा मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईसह पश्चिम उपनगरात आज पहाटेपासून अधूनमधून मुसळधार पाऊस सुरू आहे. पश्चिम उपनगरात ढगाळ वातावरण असून मागील अर्ध्या तासापासून अंधेरी,जोगेश्वरी, गोरेगाव,मालाड,कांदिवली,बोरिवली,दहिसर विलेपार्ले,सांताक्रुझ,वांद्रे या सर्व परिसरात पाऊस सुरू आहे. शुक्रवारपर्यंत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक 15 मिनिटे उशिराने तर हार्बर रेल्वेची वाहतूक 10 मिनिटे उशिराने सुरू आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूक मात्र सध्या सुरळीत आहे.
राज्यातील 23 जिल्ह्यांना यलो अलर्ट
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आज 7 ऑगस्ट रोजी राज्यातील 23 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून, वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह आणि हलक्यापासून मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणात गगडगडाट आणि वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड येथे हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग याठिकाणी विजांसह जोरदार पावसाची शक्यता आहे. या ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता
पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे, पुणे घाटमाथा, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर याठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव येथे विजांसह आणि वादळी वाऱ्यांसह पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव येथे हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अहिल्यानगरमध्येही विजांसह आणि वाऱ्यांसह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर याठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातही पावसाची शक्यता आहे. नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, यवतमाळ याठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. तर अकोला, अमरावती, बुलढाणा, गडचिरोली, वाशिम या ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली आहे.
