Search
Close this search box.

Sushma Andhare on Manikrao Kokate: आमच्याकडे आणखी व्हिडीओ, बाहेर काढायला भाग पाडू नका; सुषमा अंधारेंचा माणिकराव कोकाटेंना इशारा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

काही दिवसांपूर्वीच राज्याचे कृषीमंत्री कोकाटे (Manikrao Kokate) यांचा सभागृहात रमी खेळतानाचा एक व्हिडीओ समोर आला होता. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रोहित पवार (Rohit Pawar) यांनी तो व्हिडीओ ट्विट केल्यावर प्रचंड खळबळ माजली. विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरत माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली. तर यावर स्पष्टीकरण देताना माणिकराव कोकाटे यांनी मला जंगली रमी येत नाही. मोबाईल नंबर आणि बँक अकाऊंट ऑनलाईन रमीच्या अॅप्लिकेशनला जोडलेला नाही. कुठेही चौकशी करा, असे वक्तव्य केले. ज्यांना माझी बदनामी केली आहे, त्यांना कोर्टात खेचल्याशिवाय मी राहणार नाही, असा इशारादेखील माणिकराव कोकाटे यांनी दिला. राजीनामा देण्यासारखं काय घडलं? मी काही विनयभंग केला आहे. चोरी केली आहे का? माझी काय पार्श्वभूमी गुन्हेगारीची नाही. मी केलं काय? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. आता यावरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी माणिकराव कोकाटे यांना थेट इशारा दिला आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या की, माणिकराव कोकाटे यांची उद्धट आणि उर्मटपणाची भाषाच गंभीर आहे. त्यांना विषयाचं गांभीर्य अजूनही कळत नाही. देवेंद्रजींच्या मंत्रिमंडळात जे मंत्री आहेत त्यांना आपल्या मंत्रीपदाचा औरा कॅरी करता येत नाही. नितेश राणे मंत्री असूनही बालिश आणि समाजात दुही पसरवणारी भाषा करतात. शिरसाट यांच्यासारखा अत्यंत उद्धट माणूस मंत्रीपदावर आहे आणि माणिकराव कोकाटे यांनी तर कहरच केला आहे. यावर आता यांची भाषा आहे की, आम्ही काही विनयभंग केला का? बलात्कार केला का? माणिकराव मला आपल्याला इतिहास सांगावे लागेल. मुंबई बॉम्बस्फोटानंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी आपल्यासोबत राम गोपाल वर्मा यांना फक्त घेऊन गेल्यामुळे आत्ता सत्तेत असलेले आणि तेव्हा विरोधात असलेले भाजपने गदारोळ केला होता. त्याचा परिणाम म्हणून विलासराव देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

चक्क सभागृहात रमी खेळतात
राजकीय व्यक्ती किंवा लोकप्रतिनिधीचे वर्तन, व्यवहार कुठे आणि कसे असतात हे फार महत्त्वाचे आहे. ऑनलाइन गेमिंगमुळे इथल्या पिढ्या बरबाद होत आहेत. तुम्ही चक्क सभागृहात रमी खेळतात. ज्या सभागृहातल्या कामकाजासाठी प्रत्येक सेकंदाला चार हजार सातशे रुपये खर्च होतात. हे पैसे माणिकराव तुमच्या खिशातून जात नाहीत, ते जनतेच्या टॅक्स मधून येतात. या पैशातून लोकांच्या प्रश्नांवर चर्चा होण्यासाठी अधिवेशन आहे की तुमच्यासारख्या लोकांना रमी खेळण्यासाठी आहे? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

सन्मानाने एक्झिट घ्या
यावर जर तुमचे म्हणणे असेल की मी तुम्हाला कोर्टात खेचणार तर आम्हाला कोर्टात नंतर खेचा. तुमची आसन व्यवस्था ज्या ठिकाणी केलेली आहे, ती सर्व सत्ताधाऱ्यांची आसन व्यवस्था आहे. त्यामुळे तुमचा व्हिडिओ हा कोणत्या सत्ताधारी आमदाराने रेकॉर्ड केला? याचा पहिल्यांदा शोध घ्या. म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की, तुमची माती तुमचीच माणसं करायला बसलेले आहेत. पहिले बारा सेकंदाचा, त्यानंतर आजचा 24 सेकंदाचा, आता या पुढचे वेगवेगळ्या कृती करतानाचे आपले व्हिडिओ आमच्याकडे आहेत. ते काढायला आम्हाला भाग पाडू नका. सन्मानाने एक्झिट घ्या. हे तुमच्यासाठी बरे राहील, असा इशारा सुषमा अंधारे यांनी माणिकराव कोकाटेंना दिला आहे.

admin
Author: admin

और पढ़ें