मुंबईत 2006 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने आज (21 जुलै) महत्त्वपूर्ण निर्णय दिला. या निर्णयानुसार, स्फोट प्रकरणातील सर्व 11 आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती एस. चांडक यांच्या खंडपीठाने हा निकाल सुनावला. 2006 मध्ये चर्चगेट ते बोरिवली स्थानकांदरम्यान लोकल ट्रेनमध्ये अवघ्या 11 मिनिटांत सात ठिकाणी स्फोट झाले होते. या स्फोटांमध्ये 209 जणांचा मृत्यू, तर 800 हून अधिक नागरिक जखमी झाले होते. स्फोटासाठी प्रेशर कुकर बॉम्बचा वापर करण्यात आला होता. मात्र, तपास यंत्रणांकडून न्यायालयात योग्य व विश्वासार्ह पुरावे सादर करण्यात अपयश आल्याने, सर्व 11 आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आले. या निर्णयामुळे तपास यंत्रणांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात 2006 सालच्या मुंबई बॉम्बस्फोटाचा कट…
मार्च 2006
बहावलपूर येथील एका हवेलीत लष्कर-ए-तोयबा (LeT) चा अज़म चीमा, सिमी (SIMI) आणि लष्कर-ए-तोयबाचे दोन गट व त्यांच्या नेत्यांसह स्फोटांच्या कटाची योजना आखतो.
11 मे 2006
50 जणांना बहावलपूर येथील प्रशिक्षण शिबिरात पाठवले जाते. तिथे त्यांना बॉम्ब बनवणे, शस्त्र वापरणे आणि चौकशी दरम्यान माहिती न देता कशी वागावे याचे प्रशिक्षण दिले जाते.
25 जून 2006
लष्कर-ए-तोयबा भारतात अतिरेकी पाठवतो. कमाल अन्सारी नावाचा प्रमुख आरोपी दोन पाकिस्तानी अतिरेक्यांना नेपाळ सीमेद्वारे भारतात आणतो. अब्दुल मजीद पाच अतिरेक्यांना बांगलादेश सीमेद्वारे भारतात आणतो. एक अज्ञात व्यक्ती कच्छ (गुजरात) मार्गे चार अतिरेक्यांना भारतात आणतो.
27 जून 2006
या अतिरेक्यांना मुंबईच्या उपनगरांतील 4 ठिकाणी ठेवले जाते:
मालाड – 2 जण
बांद्रा – 4 जण
बोरीवली – 2 जण
मुंब्रा – 3 जण
8-10 जुलै 2006
बहावलपूर येथील हवेलीत आजम चीमा पुन्हा सिमी व LeT च्या गटांबरोबर अंतिम कट रचतो.
9-10 जुलै 2006
गोवंडी येथे मोहम्मद अलीच्या फ्लॅटमध्ये स्फोटकांनी भरलेले बॉम्ब तयार केले जातात.
प्रत्येक प्रेशर कुकरमध्ये:
2-2.5 किलो RDX
3.5 -4 किलो अमोनियम नायट्रेट भरले जाते.
नंतर हे बॉम्ब शेखच्या बांद्र्यातील घरात नेले जातात.
11 जुलै 2006
अतिरेकी 7 गटांमध्ये विभागले जातात – प्रत्येक गटात 2 भारतीय व 1 पाकिस्तानी अतिरेकी. प्रत्येक गटाकडे काळ्या रेक्सीनच्या पिशवीत एक प्रेशर कुकर बॉम्ब असतो. अतिरेकी चर्चगेट स्टेशनवर उतरतात आणि प्लॅटफॉर्म जोडणाऱ्या मेट्रोचा वापर करून ट्रेनमध्ये चढतात. मात्र, गर्दीमुळे एक अतिरेकी ट्रेनमध्ये चढू शकत नाही आणि नंतर झालेल्या स्फोटात तोच मरण पावतो.
दरम्यान, 11 जुलै 2006 रोजी मुंबई लोकल ट्रेनमध्ये 11 मिनिटांत 7 स्फोट झाले होते. या भीषण साखळी बॉम्बस्फोटांमध्ये 189 लोकांचा मृत्यू झाला होता आणि 827 लोक जखमी झाले होते. या प्रकरणात एटीएसने एकूण 13 आरोपींना अटक केली होती, तर 15 आरोपी फरार असल्याचे सांगितले गेले होते. त्यापैकी काही आरोपी पाकिस्तानात लपून बसल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. 2015 साली खालच्या (विशेष) न्यायालयाने या प्रकरणातील 12 आरोपींना दोषी ठरवले होते. यामध्ये 5 आरोपींना फाशीची शिक्षा, तर 7 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.
या शिक्षेला आरोपींनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. पोलिसांनी आपल्याला मारहाण करुन जबाब नोंदवले असा आरोप याप्रकरणातील दोषींनी केला होता. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आजच्या सुनावणीला सर्व 12 पैकी 11 आरोपी येरवडा, नाशिक, अमरावती आणि नागपूर कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे लावली हजेरी लावली होती. मुंबई उच्च न्यायालयाने हा निकाल फिरवत सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. 11 आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली असून एक आरोपीचा दरम्यानच्या काळात मृत्यू झाला आहे. त्यामुळे हा तपास यंत्रणांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
