टीम इंडियाची रनमशीन आणि आपल्या आक्रमक नेतृत्त्वाने भारतीय क्रिकेट संघाला नव्या उंचीवर नेऊन ठेवणारा क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) याने काही दिवसांपूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघातील (Team India) आपले स्थान डळमळीत आहे, हे लक्षात आल्याने विराट कोहली याने तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली होती. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या अनुपस्थितीत शुभमन गिलच्या (Shubman Gill) नेतृत्त्वाखालील अत्यंत नवखा भारतीय संघ इंग्लंडमधील खेळपट्ट्यांवर कसा तग धरणार, असा प्रश्नही उपस्थित झाला होता. त्यानंतर शुभमन गिलने पहिल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये खणखणीत फलंदाजी करत आपल्या टीकाकारांना प्रत्युत्तर दिले होते. मात्र, लॉर्डसच्या मैदानावर टीम इंडियाने हातातला सामना गमावल्यानंतर गिलच्या नेतृत्त्वाच्या शैलीबद्दल आणि क्षमतेविषयी पु्न्हा प्रश्न उपस्थित झाले होते. अशातच भारताचे माजी क्रिकेटपटू मदन लाल यांनी एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. मदन लाल यांनी विराट कोहलीला कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली आहे. (Team India on England tour)
लॉर्डस कसोटीत भारतीय संघ जिंकेल असे वाटत असतानाच फलंदाजांच्या हाराकिरीमुळे टीम इंडियावर पराभवाची नामुष्की ओढवली होती. ही गोष्ट मदन लाल यांच्या मनाला चांगलीच लागली आहे. त्यांनी विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करावे, अशी विनंती केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, निवृत्तीचा निर्णय मागे घेण्यात काहीही गैर नाही. विराट कोहलीने पुन्हा भारतीय कसोटी संघात येऊन युवा खेळाडूंना त्याच्या अनुभवाचा फायदा करुन दिला पाहिजे. तसेच खेळाप्रतीची निष्ठा काय असते, हे शिकवले पाहिजे, असे मदन लाल यांनी म्हटले.
विराट कोहली याची भारतीय क्रिकेटविषयी असलेली जी समर्पण वृत्ती होती, त्याचा तुलना कोणासोबतच होऊ शकत नाही. त्याने भारतीय कसोटी संघात पुन्हा यावे, ही माझी इच्छा आहे. निवृत्तीचा निर्णय मागे घेण्यात काहीही गैर नाही. त्याने इंग्लंडच्या दौऱ्यातच भारतीय संघात यावे, असे माझे म्हणणे नाही. मात्र, त्याने पुढील कसोटी मालिकेत भारतीय संघात यावे, असे मला वाटते. विराट कोहली आणखी एक ते दोन वर्षे कसोटी क्रिकेट सहजपणे खेळू शकतो. त्यामुळे त्याने निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा, हा माझा दृष्टीकोन आहे. तुम्ही अनुभवातून शिकलेल्या गोष्टी संघातील युवा खेळाडूंना सांगणे, ही गरजेची गोष्ट आहे. पण विराट अचानक कसोटी संघातून बाहेर पडला. अजूनही उशीर झालेला नाही. कृपया परत ये, अशी विनंती मदन लाल यांनी विराटला केली आहे. यावरआता विराट कोहली आणि बीसीसीआय गांभीर्याने विचार करणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
