हिंदीबरोबरच मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणारा मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. रितेशच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचं निधन झालं असून त्यानेच ही माहिती इन्स्टाग्राम स्टोरीवरुन दिली आहे. रितेशचे मॅनेजर राजकुमार तिवारी यांचं निधन झालं असून रितेशने करिअरला सुरुवात केल्यापासून त्याचं काम राजकुमारच पाहत होते. राजकुमार यांचं आकस्मिक निधन झाल्याने रितेशला मोठा धक्का बसलाय. रितेश राजकुमार यांच्या निधनाबद्दल सोशल मीडियावरुन व्यक्त झाला आहे.
भाऊ असल्याचा उल्लेख
रितेशने राजकुमार यांच्यासोबतचा फोटो शेअर करताना आपल्या भावनांना वाट मोकळी करु दिली आहे. या फोटोला सविस्तर कॅप्शन देताना भावूक झाल्याचं दिसत आहे. आपल्या आयुष्यात राजकुमार यांचं फार महत्त्व असल्याचं अधोरेखित करताना राजकुमार हे केवळ आपले मॅनेजर नव्हते तर ते उत्तम मार्गदर्शक आणि मोठ्या भावाप्रमाणे कायम सोबत राहिल्याचं रितेश म्हणाला.
जुना फोटो अन् भावूक संदेश
राजकुमार तिवारींना मिठी मारलेला जुना फोटो शेअर करताना रितेशने, “राजकुमार तिवारीजी आमच्यात नाहीत हे कळाल्यानंतर मला फार दु:ख झालं आहे. मला मोठा धक्का बसलाय. ते माझे मार्गदर्शक, माझा मोठा भाऊ, माझ्या कुटुंबासारखेच होते. माझ्या पदार्पणापासून त्यांनी माझ्यासोबत काम केलंय. ते माझ्या साऱ्या कामाचं व्यवस्थापन पहायचे,” असं म्हटलं आहे. इतकच नाही तर रितेशने, “कठीण काळात ते माझ्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले. मला तुमची कायम आठवण येईल तिवारीजी. त्यांच्या कुटुंबीयांप्रती मी सहवेदना व्यक्त करतो,’ अशी भावनिक कॅप्शन रितेशने दिली आहे.
रितेशचं करिअर
रितेशचा पहिला चित्रपट 2003 साली प्रदर्शित झालेला. अभिनेत्री आणि त्याची पत्नी जेनेलियासोबतच्या या चित्रपटाचं नाव, ‘तुझे मेरी कसम’ असं होतं. रितेशने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या अजय देवगणची प्रमुख भूमिका असलेल्या ‘रेड 2’ चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. यापूर्वी त्याने, ‘हॅलो बेबी’, ‘हाऊसफुल’, ‘मस्ती’, ‘क्या कूल है हम’, ‘धमाल’ या सारख्या गाजलेल्या हिंदी चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. 2006 साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दिग्दर्शक राम गोपाल वर्मा आणि रितेश हे ताज हॉटेलमध्ये सुरक्षा अधिकाऱ्यांसोबत फिरत असल्याचे फोटो समोर आल्याने रितेशचे वडील आणि तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख अडचणीत आलेले.
रितेशने मराठी चित्रपटसृष्टीतही सक्रिय आहे. ‘बिग बॉस मराठी’चं सूत्रसंचालन रितेशने केलं होतं. रितेशने ‘लय भारी’, ‘वेड’ यासारखे मराठी चित्रपटही केले आहेत. अगदी 2003 पासून ते 2025 पर्यंतच्या 22 वर्षांच्या मनोरंजनसृष्टीतील प्रवासात त्याला राजकुमार यांनी एक उत्तम व्यवस्थापक म्हणून साथ दिली हेच त्याच्या पोस्टवरुन दिसून येत आहे.
