शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासमध्ये चड्डी बनियनवर कर्मचाऱ्यांना मारहाण केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट पसरली. एबीपी माझाने या मारहाणीविरोधात आवाज उठवला होता. त्यानंतर संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज (16 जुलै) संजय गायकवाड यांच्या मारहणीच्या निषेधार्थ विधानसभेच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जोरदार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड, आमदार शशिकांत शिंदे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांच्यासह महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानसभेच्या पायऱ्यांवरती जोरदार आंदोलन केलं. यावेळी सरकार विरोधात एकच घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडण्यात आला.
यावेळी चड्डी बनियन गँग हाय हाय, या गुंडाराज सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, या लुटारू सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, अशा घोषणा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून देण्यात आला. या आंदोलनामध्ये संजय गायकवाड यांच्या विरोधातील बॅनर सुद्धा लक्ष वेधून घेत होता. महाराष्ट्राची लूट करणाऱ्या चड्डी बनियनचा धिक्कार असो असा या बॅनरवरती उल्लेख करण्यात आला होता, तर बाजूलाच संजय गायकवाड यांचा बॉक्सिंग अवतारमधील फोटो होता. दुसरीकडे विधानसभा अधिवेशनाचा कालावधी तीन दिवस राहिलेला असतानाही आतापर्यंत विरोधी पक्षनेत्याची निवड करण्यात आलेली नाही. त्यामुळे आज दिवसभरात पडसाद उमटणार का? याकडे लक्ष असेल.








