शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी केलेले उपनेते सुनील बागूल (Sunil Bagul), महानगरप्रमुख मामा राजवाडे (Mama Rajwade) यांच्या विरोधातील तक्रार गजू घोडके (Gaju Ghodke) यांनी मागे घेतल्याने बागूल, राजवाडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, यामुळे या दोघांचाही भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. सोमवारी बागूल यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार होती. मात्र, या प्रकरणातील तक्रार अर्जच मागे घेतल्याने जामिनाचा अर्ज बागूल यांनी मागे घेतला.
याबाबत माहिती अशी की, तक्रारदारने पोलिसांना लेखी पत्र देत सांगितले की, मला या दोघांनी कोणतीही मारहाण केलेली नाही, त्यामुळे संबंधित गुन्हा रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामुळे सुनील बागूल आणि मामा राजवाडे यांचा भाजपप्रवेश लवकरच होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाचे महानगरप्रमुख विलास शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी नाशिकमधील महानगरप्रमुखपदाची जबाबदारी मामा राजवाडे यांच्यावर सोपवली. मात्र, भाजपने त्यांनाच गळाला लावल्याने नाशिकच्या राजकारणात खळबळ उडाली होती.
गुन्हा दाखल झाल्यापासून दोघेही होते फरार
मामा राजवाडे यांची महानगरप्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर नाशिक पोलिसांनी एका मारहाण प्रकरणात सुनील बागूल आणि राजवाडे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. हे दोघेही पोलिसांच्या हाती लागले नव्हते. दुसरीकडे, या दोघांकडून अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरू होते. तो मिळेपर्यंत बागूल, राजवाडे अज्ञातवासात होते. त्यामुळे पोलिसांच्या दप्तरी या दोघांची नोंद ‘फरार’ अशी झाली होती. परंतु गुन्हा दाखल झालेल्या या दोघांना भाजप ‘पावन’ करून घेणार असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता.
पुढील आठवड्यात भाजपमध्ये प्रवेश?
यामुळे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते, यामुळे या दोघांचा पक्षप्रवेश थांबवण्यात आला. न्यायालयाच्या निर्णयानंतरच या दोघांचा भाजप प्रवेशाचे भवितव्य अवलंबून होते. मात्र आता तक्रारदारानेच तक्रार मागे घेण्याबाबत अर्ज दिल्याने सुनील बागूल आणि मामा राजवाडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आता या दोन्ही नेत्यांचा लवकरच भाजपप्रवेश होणार आहे. कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून दोघे नेते पुढील आठवड्यात भाजप प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भाजप खासदार निशिकांत दुबे यांना मानहानीची नोटीस
भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी काही दिवसांपूर्वी “मराठी माणसाला पटक पटक के मारेंगे, तुम्ही आमच्या टॅक्सवर जगता” असे वक्तव्य केले होते. या विधानावर आता मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसेचे नाशिक शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी यासंदर्भात नोटीस पाठवत, निशिकांत दुबे यांना ७ दिवसांत सार्वजनिक माफी मागण्यास सांगितले आहे. तसेच, त्यांनी सोशल मीडियावर अपलोड केलेले संबंधित सर्व व्हिडिओ तात्काळ हटवावेत, अशी मागणीही नोटीसमध्ये स्पष्टपणे नमूद केली आहे. जर निशिकांत दुबे यांनी यासंदर्भात माफी मागितली नाही, तर त्यांच्याविरोधात नाशिकमधील न्यायालयात मानहानीचा गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा सुदाम कोंबडे यांनी दिला आहे.
