Search
Close this search box.

शिवरायांचे 12 किल्ले ‘जागतिक वारसा’ घोषित झाल्यानंतर राज ठाकरेंची टेन्शन वाढवणारी पोस्ट; म्हणाले, ‘सरकारने फक्त…’

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

महाराष्ट्रातील 11 आणि तामिळनाडू एक अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थळं म्हणून घोषित करण्यात आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. या निर्णयावर पहिली प्रतिक्रिया नोंदवताना राज ठाकरेंनी एक खास पोस्ट लिहित आपलं मत मांडलं आहे.

“महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या 12 किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांचा दर्जा दिला आहे. ही अतिशय आनंदाची बाब आहे. या 12 किल्ल्यांमध्ये 11 किल्ले महाराष्ट्रातील आहेत आणि एक किल्ला जिंजीचा किल्ला तामिळनाडू मधला आहे. या निमित्ताने महाराजांनी रुजवलेला स्वराज्याचा विचार कुठवर पोहचला होता हे महाराष्ट्राचं कर्तृत्व यावर बोलणाऱ्यांना हे कळेल आणि महाराष्ट्र ते थेट दक्षिणेत तामिळनाडूपर्यंत दोन भाषांचा आणि संस्कृतींचा सेतुबंध किती जुना आणि मजबूत आहे हे पण कळेल,” असं राज यांनी म्हटलं आहे.

“या निमित्ताने महाराजांच्या या महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांचं किमान नीट संवर्धन होईल अशी अपेक्षा. एकदा युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला की त्या वास्तूचं संवर्धन, नूतनीकरण याचे खूप कडक निकष असतात ते पाळावे लागतील, पण त्यामुळे किमान महाराजांचे किल्ले तरी नीट राखले जातील. आता राज्य सरकारला या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी निधी उपलब्ध होईल आणि राज्याने देखील उत्तम निधी उपलब्ध करून द्यावा. आत्तापर्यंतच्या एकूण एक सरकारांनी गडकिल्ल्यांची जी दुरवस्था करून ठेवली होती त्यामुळे जगाला बोलावून हे किल्ले दाखवावे, आपल्या महाराजांचं, महाराष्ट्राचं वैभव दाखवावं अशी परिस्थिती नव्हती ती आता बदलेल अशी आशा व्यक्त करतो. मी आम्ही हे गेली अनेक वर्षे म्हणत आलो आहे की महाराजांनी उभारलेले किल्ले आणि महाराष्ट्राला लाभलेली किनारपट्टी याचं नीट जतन केलं आणि तिथे पर्यटनासाठी योग्य पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या तरी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कुठच्या कुठे निघून जाईल,” अशी आठवण राज यांनी करुन दिली.

“फक्त सरकारला एक आठवण करून द्यावीशी वाटते ती म्हणजे युनेस्कोने जागतिक वारसा दर्जा दिला म्हणून युनेस्कोसारख्या संस्थांना गृहीत धरता येत नाही. जर निकष नीट नाही पाळले तर युनेस्को हा दर्जा काढून घेतं, याची आत्तापर्यंतची दोनच उदाहरणं आहेत पण ती आहेत हे विसरू नका. एक उदाहरण आहे ओमान मधल्या अरेबियन आवरिक्स अभयारण्याचं आणि दुसरं उदाहरण आहे ड्रेस्डन व्हॅलीचं… जर्मनीतील ड्रेस्डन व्हॅलीला जागतिक वारसा दर्जा मिळाला पण निकष न पाळल्याने तो 2009 ला काढून घेतला. यामुळे सरकारने फक्त आनंद साजरा करू नये तर एका मोठ्या जबाबदारीचं भान देखील बाळगावं. तसेच सर्वप्रथम या सर्व गडकिल्ल्यांवरची जी काही अनधिकृत बांधकामं आहेत ती तात्काळ पाडून टाका ! त्यात जात – धर्म पहाण्याची गरज नाही,” असा सूचक इशारा राज यांनी दिला आहे.

पोस्टच्या शेवटी राज यांनी, ‘पुन्हा एकदा मराठी जनतेचं अभिनंदन,’ असं म्हटलं आहे.

admin
Author: admin

और पढ़ें