गुजरातमध्ये मुसळधार पावसात पूल कोसळल्याची एक मोठी घटना समोर आली आहे. बुधवारी सकाळी आणंद आणि वडोदरा यांना जोडणारा गंभीरा पूल कोसळला. त्यामुळे अनेक वाहने नदीत कोसळली. या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला तर 3 जणांना वाचवण्यात यश आले आहे.
काँग्रेस नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अमित चावडा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून यासंदर्भात माहिती दिली आणंद आणि वडोदरा जिल्ह्यांना जोडणारा मुख्य गंभीरा पूल कोसळला. अनेक वाहने नदीत पडल्याने मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी तातडीने बचावकार्य सुरू करावे आणि वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था करावी, असे त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले.
नदी पूलाचे दोन तुकडे
गुजरातमधील आणंद जिल्ह्यातील हा गंभीरा पूल अचानक मधूनच तुटला. हा पूल महिसागर नदीवर होता. आणि तो कोसळल्याने दोन जड ट्रक नदीत पडले. अपघातानंतर स्थानिक प्रशासन आणि आपत्ती निवारण पथके लगेचच घटनास्थळी पोहोचली असून बचावकार्य सुरू आहे. पाणबुड्यांच्या मदतीने नदीत पडलेल्या चालकांचा आणि इतर संभाव्य जखमींचा शोध घेतला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून गुजरातमध्ये पाऊस सुरू आहे. गंभीरा पूल हा मध्य गुजरातमधील महत्त्वाच्या पुलांपैकी एक आहे. तो मध्य गुजरातला सौराष्ट्रशी जोडतो. मिळालेल्या माहितीनुसार हा पूल 45 वर्षे जुना आहे.
कोणती वाहने पडली?
माहितीनुसार गंभीरा पूल तुटला तेव्हा त्यावेळी पुलावर काही वाहने होती. ज्यांची धडक झाली. दोन ट्रक, एक बोलेरो जीपसह चार वाहने नदीत पडली. माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दल पोहोचले आणि गोताखोरांनी लोकांना वाचवण्यासाठी नदीत बचाव कार्य सुरू केले.
2 जणांचा मृत्यू, 3 जणांचे जीव वाचले
गंभीरा पूल हा महिसागर नदीवर बांधण्यात आला होता, जो वडोदरा आणि आनंदला जोडतो. मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला होता, ज्यामुळे पूल तुटला आणि नदीत वाहून गेला. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने बचाव कार्य सुरू केले आणि 3 जणांचे प्राण वाचवले. या अपघातात २ जणांना आपला जीव गमवावा लागला.
दोन्ही बाजूंनी लांब वाहतूक कोंडी
पूल कोसळल्यामुळे वडोदरा आणि आणंदमधील संपर्क विस्कळीत झाला आहे. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. यानंतर पोलिसांनी वाहतूक वळवली आहे.
