हवामान विभागाच्या वतीनं कृष्णानंद होसाळीकर यांनी जारी केलेल्या माहितीनुसार पुढील 5 दिवस राज्यासाठी IMDने तीव्र हवामान अलर्ट जारी केले असून, कोकणात, मध्य महाराष्ट्र घाट भागात आणि विदर्भात काही भागांत तुरळक ठिकाणी मुसळधार-अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, मराठवाड्यातील काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
गेल्या 48 तासांपासून राज्याच्या कोकण भागासह घाटमाथ्यावरील भागाला पावसानं झोडपलं असून, मुंबई शहर आणि उपनगरांमध्येसुद्धा पावसाच्या जोरदार सरींची बरसात झाल्याचं पाहायला मिळालं. याच धर्तीवर पुढील 48 तासांमध्येसुद्धा चित्र फारसं बदलणार नसून शनिवारपासून राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार असल्याचा इशारा हवामान विभाहानं जारी करत दरम्यानच्या काळात राज्यातील काही भागांना अतिवृष्टीचा तडाखा बसेल असं सांगण्यात आलं आहे. पावसाळी ढग घाटमाथ्यावर दाटी करणार असून त्यामुळं दृश्यमानतासुद्धा कमी होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
सध्याच्या घडीला गंगेच्या क्षेत्रातील पश्चिम बंगालच्या उत्तर दिशेकडे असणाऱ्या भागांवर आणि नजीकच्या काही भागांमध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली असून, कमी दाबाचा पट्टा उत्तर गुजरातपासून पश्चिम बंगालच्या उत्तरेकडील भागांवर परिणाम करतान दिसत आहे.
महाराष्ट्र कर्नाटक किनाऱ्यालगतसुद्धा समुद्रसपाटीपासून कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्या कारणानं या हवामान प्रणालीची गती पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, परिणामस्वरुप शनिवारपासून थेट मंगळवारपर्यंत राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
राज्याच्या कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात पावसाचा सर्वाधिक जोर राहणार असल्या कारणानं पावसाळी सहलींसाठी जाणाऱ्यांचा उत्साह वाढलेला असला तरीही जलप्रवाह अतिप्रचंड प्रमाणात प्रवाहित होत असल्या कारणानं नागरिकांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
फक्त कोकणच नव्हे, तर पूर्व विदर्भातही पावसाचा जोर अधिक राहणार असून, भंडारा, नागपूर, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात रविवार आणि सोमवारी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, मराठवाड्यातही शनिवारपासून सोमवारपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता असून, उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
