न भूतो न भविष्यती असा ग्रँड सोहळा आज मुंबईतील (Mumbai) वरळी डोम येथे पार पडला. तब्बल 20 वर्षांनी ठाकरे बंधू एकत्र आल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे या सोहळ्यात केवळ ठाकरे बंधू म्हणजेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेच एकत्र आले नाही, तर ठाकरे कुटुंबीय एकत्र पाहायला मिळाले. ठाकरेंची चौथी पिढीही व्यासपीठावर एकत्र दिसून आली, मनसेचे नेते अमित ठाकरे आणि शिवसेना आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे चुलत भाऊ देखील मराठीच्या मुद्द्यावरुन आयोजित विजय जल्लोष मेळाव्यासाठी एकत्र आले. यावेळी, दोन भावांना जवळ घेऊन फॅमिली फोटो फ्रेम देण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सुप्रिया सुळे आत्याबाईंच्या भूमिकेत दिसले, ज्यांनी दोन्ही भाच्यांना हाताला धरुन एकमेकांना जवळ आणलं.
गल्लीपासून अगदी दिल्लीपर्यंत ज्याची उत्सुकता होता, तो ठाकरे बंधूंचा मेळावा तितकाच भारदस्त आणि ग्रँड आयोजनाने संपन्न झाला. या सोहळ्यात दोन्ही ठाकरे बंधूची भाषणंही तितकीच प्रभावी झाल्याचं पाहायला मिळालं. दोघांनी अप्रत्यक्षपणे भाजपला डिवचलं तर उद्धव ठाकरेंनी थेट नाव घेऊन भाजप आणि केंद्रातील मोदी सराकरवर हल्लाबोल केला. या सोहळ्यातील भाषणानंतर ठाकरे कुटुंबीय देखील व्यासपीठावर एकत्र पाहायला मिळालं. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत इतरही राजकीय पक्षाचे नेते उपस्थित होते. तर, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हेही एकत्र येऊन मीडियाला सामोरे गेले. त्यावेळी, शेजारीच उभ्या असलेल्या खासदार सुप्रिया सुळेंनी अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना हाताला धरुन पुढे घेतलं. राज ठाकरेंच्या शेजारी आदित्य आणि उद्धव ठाकरेंच्या शेजारी अमित यांना उभे करत आत्याबाईंची भूमिका बजावल्याचं पाहायला मिळालं.
विजयी मेळाव्याच्या निमित्ताने तब्बल 19 वर्षांनंतर एका व्यासपीठावर एकत्र दिसले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची स्टेजवर ग्रँड एन्ट्री झाली. त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकमेकांना मिठी मारली, हा क्षण पाहून अवघा महाराष्ट्र भावूक झाल्याचं दिसून आलं. दरम्यान, विजयी मेळावा संपल्यानंतर ठाकरे कुटुंबीयांनी एकत्र फोटो काढले. यावेळी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंनी देखील स्टेजवर पुढे येत हातात हात मिळवला.
राज ठाकरे काय काय म्हणाले?
आजचा मेळाव्याला घोषणा हीच आहे कोणताही झेंडा नाही मराठी हाच अजेंडा. मराठीकडे कुणी वाकड्या नजरेने पहायचं नाही, असा इशारा राज ठाकरेंनी दिला. तुमच्याकडे विधानभवनात सत्ता आहे आणि आमच्याकडे रस्त्यावर सत्ता आहे, असं राज ठाकरेंनी सांगितलं. एक भाषा उभी करायला प्रचंड ताकद लागते. भाषा अशाच उभ्या राहत नसतात. अमित शाह म्हणतात ज्याला इंग्रजी येत त्याला लाज वाटेल इंग्रजी येते म्हणवून. पण तुम्हाला येतं कुठे? आम्ही मराठी भाषा कधी लादली का? हिंदी फक्त 200 वर्ष पूर्वीची आहे. यांनी आत्ता चाचपडून पहिलं. यांना काय मज्जाक वाटली का सक्ती करायला?, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. मी बाळासाहेब ठाकरे यांना सांगितलं. सुरेश जैन यांना मुख्यमंत्री करायचं ठरलं आहे. मला बाळासाहेबांनी सांगितलं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीच होईल. असे संस्कार झालेला व्यक्ती मराठीसाठी तडजोड करेल का?, असा सवाल उपस्थित करत मराठीसाठीची एकजूट कायम राहणं गरजेचं आहे, असंही राज ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटले होते, कोणावरही अन्याय करु नका. पण कोणी अंगावर हात उगारला तर तो हात जागेवर ठेऊ नका. देवेंद्र फडणवीस म्हणतात भाषिक गुंडगिरी सहन करणार नाही. फडणवीसांचे सगळे चेलेचपाटे हेच म्हणतात. पण मराठी माणूस इतर राज्यांमध्ये जाऊन कोणावर भाषिक दादागिरी करेल का? इतर राज्यांमध्ये कोणी असे केले तर भाषिक दादागिरी करणाऱ्या व्यक्तीला चिरुन टाकतील, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. काल एक गद्दार ‘जय गुजरात’ बोलला. अरे किती लाचारी करायची? पुष्पा पिक्चरमध्ये हिरो दाढीवरुन हात फिरवून म्हणतो, ‘झुकेगा नय साला’. पण आपले गद्दार म्हणतात, ‘कुछ बी बोलो, उठेगा नही साला’. हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध न करणारा बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक सू शकेल का? आपला मालक आला म्हणून त्याच्यासमोर जय गुजरात म्हणणारा बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक असू शकेल का?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला. आपण आता डोळे उघडले नाहीत तर पुन्हा कधी आपले डोळे उघडण्याची वेळ येणार नाही. आता आलेली जाग जाणार असेल तर भविष्यात स्वत:ला मराठी आईची मुलं बोलू नका, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
