यंदाच्या आषाढी वारीत पावसाच्या जोरदार सरींचा फटका बसत असतानाच वारी मार्गावरील सर्वात महत्त्वाचा टप्पा पंढरपूरातील दर्शन रांग यंदा भाविकांसाठी अधिक सुरक्षित आणि सुसज्ज करण्यात आली आहे. गोपाळपूर येथे 500 बाय 150 फूटाचा भव्य वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आला आहे. हा मंडप यंदा पहिल्यांदाच उभारण्यात आला असून, सुमारे 25 ते 30 हजार भाविक या मंडपात सुरक्षितपणे आणि कोरड्या अवस्थेत उभे राहून विठ्ठलाचे दर्शन घेऊ शकणार आहेत.
भाविकांना न भिजता दर्शनाची सोय
यावर्षीच्या आषाढी वारीत सुरुवातीपासूनच पावसाचा जोर कायम आहे. वारकऱ्यांच्या पालख्या आता पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत. अशा परिस्थितीत, गोपाळपूर पत्रा शेड परिसरात उभारण्यात आलेला हा विशाल दर्शन मंडप भाविकांसाठी फार मोठा दिलासा ठरणार आहे. मंडप संपूर्ण वॉटरप्रूफ असून त्याची उंची जवळपास 20 फूट ठेवण्यात आली आहे, जेणेकरून गर्दी असतानाही श्वसनास अडथळा होणार नाही.
पांढऱ्या कापडाने सुशोभीकरण
मंडपाच्या आतून पांढऱ्या कापडाने सुशोभीकरण करण्यात आले असून, सर्वत्र पंख्यांचीही व्यवस्था करण्यात येत आहे. यामुळे वारकऱ्यांना ऊन आणि पावसापासून संरक्षण मिळणार आहे. दरवर्षी छोटे छोटे मंडप उभारून त्यामधून दर्शन रांग ठरवण्यात येत असे. अशावेळी चेंगराचेंगरी आणि घुसखोरीचे प्रसंग वारंवार समोर येत असत. आता या विशाल दर्शन रांगेमुळे भाविक मोकळेपणाने देवाच्या दर्शन रांगेत उभा राहू शकणार आहेत.
तुकोबांची पालखी आज आकुर्डीत मुक्कामी
दरम्यान, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गावर ही काही प्रमाणात पाणी साचत आहे. मात्र ऊन, वारा अन पाऊस काहीही असो वारकऱ्यांना पांडुरंगाच्या भेटीची ओढ असते, त्यामुळं तो सर्व काही विसरुन पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होतो. तुकोबांच्या पालखी प्रस्थानानंतर आज पालखी देहूतून पिंपरी चिंचवडच्या आकुर्डीत मुक्कामी येणार आहे. पण या मार्गावर आता परिस्थिती आवाक्यात असली तरी पावसाचा जोर वाढला तर रस्ते पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे, असं असलं तरी वारकरी पावसात ही आजचा टप्पा पूर्ण करणार आहेत. तर आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान ही आहे. लाखो वारकरी अलंकापुरीत दाखल झाले आहेत. मात्र इंद्रायणीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं वारकऱ्यांचा हिरमोड होणार आहे. कारण माऊलींच्या चरणी माथा टेकवण्यापूर्वी वारकरी या पवित्र इंद्रायणीत स्नान करतो, अशी प्रथा आहे. मात्र पावसाचा जोर असाच कायम राहिला तर या प्रथेत खंड पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
