पुणेकरांनो सावधान ! पुणे शहरात घरफोडी चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असतानाच आता साथीदारासह पहाटेच्या वेळी घरात शिरून मोबाईल आणि रोख रक्कम लंपास करणाऱ्या महिलेचा कारनामा सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे . पुण्यातील कर्वेनगर भागात पहाटेच्या वेळी साथीदारासह घराच्या आत डोकावत महिलेने चार मोबाईल फोन आणि रोकड चोरी केल्याची घटना समोर आली आहे .मुरलीधर आंगरे यांनी याबाबत पोलिसात तक्रार दिल्यानंतर वारजे पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय .
ती आली तिने पाहिलं अन् मोबाईल घेऊन पसार झाली ..
पुण्यातील कर्वेनगर भागात एका महिलेने घरात शिरून चार मोबाईल आणि रोकड चोरी केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेरात समोर आली आहे . मिळालेल्या माहितीनुसार ही घटना 15 जून रोजी सकाळी साडेसहा वाजता घडली आहे . तक्रारदार मुरलीधर आंगरे हे त्यांच्या व्यवसायासाठी बाहेर गेले असता त्यांच्याकडे आलेल्या पाहुण्यांच्या मोबाईल चोरीला गेल्याची घटना घडली आहे .पुण्यातील कर्वेनगर परिसरात असलेल्या दुधाने हाइट्स येथे ही घटना घडली .फिर्यादी मुरलीधर आंगरे यांच्या घराखालीच डेअरी आणि हॉटेलचा व्यवसाय आहे . फिर्यादींच्या घरी काही पाहुणे आले होते .पहाटेच्या वेळी दार उघडे असल्याचे पाहून चोरट्यांनी डाव साधला .फिर्यादी यांच्या पत्नीकडे काम करत असल्यामुळे त्यांनी तिला फोन लावला असता तो बंद लागला .नंतर शोधाशोध केल्यानंतरही फोन मिळाला नसल्याचे लक्षात आल्यानंतर चोरीची घटना उघडकीस आली .त्यानंतर आपल्या घरी चोरी झाल्याचे लक्षात येताच फिर्यादींनी पोलीस ठाण्यात धाव घेतली .या घटनेनंतर वारजे पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय .
काय दिसतय सीसीटीव्हीत ?
चोरीची घटना घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्यावरून चोर महिलेला ओळखण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वारजे पोलिस ठाण्यात अज्ञात महिला चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे घटनेच्या तपासात समोर आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात, एक महिला अपार्टमेंटमध्ये जाताना दिसते . घरांमध्ये डोकावत एकूण चार मोबाईल ती आपल्या ड्रेसमध्ये लपवत असल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे .
