शहरात पुन्हा एकदा कोयता गँगने धुमाकूळ घातला आहे. रविवारी नाशिकच्या (Nashik News) दोन वेगवेगळ्या भागांमध्ये कोयता गँगने खुलेआम हातात कोयते नाचवत नागरिकांमध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न केलाय. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ सध्या समोर आला असून, सोशल मीडियावर तो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
संजीवनगरमध्ये वाहनांची तोडफोड
पहिला प्रकार अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संजीवनगर भागात घडला. रविवारी रात्री उशिरा काही जणांनी हातात कोयते घेऊन पार्किंगमध्ये घुसून वाहनांची तोडफोड केली. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, जुन्या वादातून ही नासधूस झाल्याची माहिती समोर आली आहे. वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
जेलरोड परिसरात तरुणावर हल्ला
दुसरा प्रकार नाशिकरोड परिसरातील जेलरोड भागात घडला. येथे कोयता गँगने रस्त्यात उभ्या असलेल्या एका तरुणावर थेट हल्ला चढवला. हल्लेखोरांनी परिसरातील वाहनांवरही कोयत्याने वार करत तोडफोड केली. गंभीर जखमी तरुणाला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलिसांसमोर कोयता गँगची दहशत मोडण्याचे आव्हान
या दोन्ही घटनांमुळे नाशिकमध्ये पुन्हा एकदा कोयता गँगचा उद्रेक झाल्याचे चित्र दिसून येत आहे. सातत्याने अशा घटना घडत असूनही, या गँगवर प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. नाशिक पोलिसांसमोर आता कोयता गँगची दहशत मोडून काढण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
नाशिक ग्रामीण पोलिसांकडून मोठी कारवाई
दरम्यान, नाशिक जिल्ह्यात अंमली पदार्थविरोधी पथकाकडून विशेष मोहीम सुरू केली आहे. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी सोमवारी जिल्ह्यातील 40 पोलिस ठाण्यांच्या हद्दीत अचानक मोहिम राबवत एनडीपीएसचे 22 गुन्हे दाखल करण्यात आले. 29 संशयितांना अटक करण्यात आली. गांजा, कुत्ता गोळी, भांगेसह जिल्ह्यात एकाच दिवसात 8.50 लाखांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. ग्रामीण पोलिस दलाचा पदभार स्वीकारताच अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी अंमली पदार्थविरोधी मोहीम सुरु केली. सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. कुठेही अंमली पदार्थ विक्री, वापर, सेवन, साठा असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
