उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर शिवसेनेच्या मंत्र्यांची एक महत्त्वपूर्व बैठक घेतली आहे. ही बैठक स्वतंत्रपणे करण्यात आली असून यावेळी शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या प्रत्येक मंत्र्यासोबत ‘वन टू वन’ चर्चा केली. मात्र, प्रत्येक खात्याचा आढावा घेत असताना शिंदेंच्या मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबतची नाराजी बोलून दाखवली आहे. त्यामुळे शिंदेंचे सर्वच्या सर्व अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर नाराज असल्याचं समोर आलंय.
लवकरात लवकर कामे पूर्ण करा, फाइल पेंडिंग ठेऊ नका, शिंदेंच्या मंत्र्यांना सूचना
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजच्या या बैठकीत प्रत्येक खात्याचा आढावा घेतला. खात्याचे काम कसे सुरू आहे? किती कामे केली किती करायची आहेत? निधी संदर्भात काही अडचणी आहेत का? इतर कोणती अडचण आहे का? भविष्यात तुमच्या खात्यामधून कोणते महत्वाचे काम हाती घेणार? अशा सर्व बाबींची माहिती एकनाथ शिंदे यांनी घेतली. लोकोपयोगी कामांवर भर द्या, लवकरात लवकर कामे पूर्ण करा, फाइल पेंडिंग ठेऊ नका, सामान्य लोकांपर्यंत पोहोचा असा सल्ला देखील शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना दिला.
आम्हाला पैसे देणार नसतील तर आम्ही काम कसं करणार? मंत्र्यांची अजित पवार यांच्याबाबत नाराजी
अजित पवार अर्थमंत्री आहेत, ते जर आम्हाला पैसे देणार नसतील तर आम्ही काम कसं करणार? अशी चिंता देखील यावेळी शिंदेंच्या सर्व मंत्र्यांनी व्यक्त केली आहे. सरकारमध्ये सर्वांना समान अधिकार मिळायला हवेत, असं मंत्र्यांनी बोलून दाखवलं आहे. दरम्यान, मंत्र्यांनी अजित पवार यांच्याबाबत नाराजी व्यक्त केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी देखील मंत्र्यांना महत्त्वाचं आश्वासन दिलंय. मी स्वत: अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलेन आणि मार्ग काढेन, असा शब्द एकनाथ शिंदेंनी मंत्र्यांना दिलाय.
