एका दिवसाच्या विश्रांतीनंतर मुंबई आणि ठाण्यामध्ये पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावल्याचं दिसून आलं. मुंबई, ठाणे, नवी मुंबईत मुसळधार पाऊस सुरु आहे. मंगळवारी दिवसभर विश्रांती घेतल्यावर बुधवारी दुपारनंतर पावसाची जोरदार बॅटिंग सुरू झाली.
मुंबईत सुरू झालेल्या पावसामुळे मध्य रेल्वे 20 ते 25 मिनिटं उशिरानं धावत आहेत. तर पश्चिम रेल्वे 5 ते 10 मिनिटं विलंबानं धावत आहे. भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात देखील जोरदार पाऊस सुरू आहे. मुंबईचा पश्चिम उपनगरात दुपारनंतर सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली गेला. अंधेरी सबवेमध्ये दोन ते तीन फूट पाणी भरल्यामुळे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
मुंबई सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे मेट्रो 3 च्या आचार्य अत्रे मेट्रो स्थानकानंतर आता वरळी मेट्रो स्थानकातही छत गळती सुरू झाली आहे. वरळी मेट्रो स्थानकातील तिकीट काउंटरजवळ ही गळती सुरू झाली असून ती रोखण्यासाठी खाली बादली ठेवण्यात आल्याचं चित्र आहे. बादली भरल्या नंतर कर्मचाऱ्यांकडून पाणी बाहेर फेकले जात असून छत गळतीमुळे प्रवाशांमध्ये नाराजी दिसत आहे. आचार्य अत्रे मेट्रो स्थानकानंतर वरळी स्थानकावरही तातडीने लक्ष द्यावे अशी प्रवासी वर्गाची मागणी आहे.
Maharashtra Rain Update : भिवंडीमध्ये जोरदार पाऊस
बुधवारी दुपारनंतर भिवंडीमध्ये जोरदार पाऊस सुरू. मुसळधार पावसामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचल्याचं दिसून आलं. भाजी मार्केटसह तीनबत्ती परिसरात दीड ते दोन फुटांपर्यंत पाणी साचलं. त्यामुळे बाजारात खरेदीसाठी गेलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.
Sindhudurg Rain : तळकोकणात रेड अलर्ट, सिंधुदुर्गात NDRF पथक
तळकोकणात बुधवारी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात एनडीआरएफ ची एक तुकडी दाखल झाली आहे. जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थितीत निर्माण झाल्यास नागरिकांना त्या स्थितीतून बचाव करता एनडीआरएफची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे. गेले काही दिवस जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे मुसळधार पाऊस कोसळल्यास पूरस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांना मदतकार्य मिळवण्यासाठी एनडीआरएफ ची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे.
बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे शेताला तळ्याचं स्वरूप आल्याचं चित्र आहे. त्यामुळे खरिपासाठी केलेली मशागत देखील वाया गेली. खामगाव, शेगाव आणि संग्रामपुरात मुसळधार पाऊस पडत आहे. मशागत वाया गेल्यानं शेतकरी चिंतेत सापडलेत.
