(Beed News) बीडमध्ये आणखी एका टोळीवर मकोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. संतोष देशमुख (santosh deshmukh murder case) हत्या प्रकरणातील आरोपी (Walmik Karad) वाल्मिक कराडमागोमार आता बीडमध्ये पुन्हा एकदा गुन्हेगारी टोळ्या सक्रिय असून, त्याच धर्तीवर एक मोठी कारवाई समोर आली आहे.
बीडमध्ये टोळीप्रमुख रघुनाथ रामराव फडसह सात जणांवर मकोका लावण्यात आला आहे. मुख्य आरोपी रघुनाथ फड हा वाल्मिक कराडचा जुना सहकारी असून, पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत यांनी विशेष पोलीस महानिरीक्षकांना या कारवाईसाठी प्रस्ताव दिला होता प्रस्ताव. बुधवारी विशेष पोलीस महानिरीक्षकांनी मकोका अंतर्गत ही कारवाई केली.
फड टोळीतील माणसं परळीसह अंबाजोगाई विभागात दहशत निर्माण करून धुमाकूळ घालत असल्याचं वृत्त समोर येत आहे. गुन्हेगारांनी संघटितरित्या परळी शहर, संभाजीनगर पोलीस स्टेशन आणि अंबाजोगाई ग्रामीण हद्दीत दहा गुन्हे केल्याचं तपासातून निष्पन्न झालं आहे.
आरोपींवर आणि या टोळीवर खुनाचा प्रयत्न, दुखापत करणे, अवैध शस्त्र बाळगणे, जबरी चोरी, दरोडा, मारहाण, कट रचणे यासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. प्राथमिक तपासातून समोर आलेल्या वृत्तानुसार या टोळीतील दोन आरोपी फरार असुन पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे. यापूर्वी कराड गॅंगसह बीड शहरातील आठवले गॅंगवरही मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. आता फड टोळीवरील कारवाईमुळं पुन्हा बीडमधील गुन्हेगारी घटनांनी आणि पोलीस कारवायांनी राज्याचं लक्ष वेधलं आहे.
