सिंदूरचा रंग हा पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला करुन सांडलेल्या रक्ताच्या रंगापेक्षा वेगळा नसतो असं उत्तर काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी दिलं आहे. सौदी अरेबियाच्या अल अरेबिया वृत्तवाहिनीशी संवाद साधताना अँकरने शशी थरुर यांना ‘ऑपरेशन सिंदूर’ नाव महत्त्वाचं का आहे आणि ते लोकांचं लक्ष वेधून का घेत आहे असा प्रश्न विचारला. भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर साधलेल्या या संवादादरम्यान शशी थरुर यांनी भारताची बाजू परखडपणे मांडली.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या फोटोत नौदल अधिकारी लेफ्टनंट विजय नरवाल यांच्या मृतदेहाशेजारी हिमांशी नरवाल बसलेल्या होत्या. नुकतंच लग्न झाल्याने हनिमूनला पहलगामला आले असता, दहशतवादी हल्ल्यात विजय नरवाल शहीद झाले. या फोटोचा संदर्भ देत शशी थरुर यांनी भारतीय महिला विवाहित असल्याची निशाणी म्हणून भांगेत सिंदूर लावतात असं सांगितलं. ते म्हणाले. “पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर देशातील जनतेला एका फोटोने जागवलं, ज्यामध्ये एका नवविवाहित वधूला पतीच्या मृतदेहाच्या शेजारी हतबलपणे बसावं लागलं. दुसऱ्या शब्दांत सांगायचं झालं तर, दहशतवादी हल्ल्याने तिच्या भांगेतील सिंदूर पुसलं होतं”.
पुढे ते म्हणाले, “मी असंही म्हणेन की, सिंदूरचा रंग रक्ताच्या रंगापेक्षा वेगळा नसतो आणि आपल्या देशात दहशतवाद्यांनी तोच सांडला होता. यामागे नक्कीच हा विचार आहे. मला वाटतं की या ऑपरेशनला असं नाव देणं हा एक अतिशय भावनि आणि शक्तिशाली निर्णय होता,” असे तिरुवनंतपुरमचे चार वेळा खासदार राहिलेले थरूर म्हणाले”.
याआधीही शशी थरुर यांनी ऑपरेशनला देण्यात आलेलं नाव जबरदस्त असून, ज्याने कोणी याचा विचार केला तो कौतुकास पात्र आहे असं म्हटलं होतं.
काँग्रेस खासदार शशी थरुर आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांना दिलेल्या मुलाखतींमध्ये भारताची भूमिका स्पष्ट करत आहेत. पाकिस्तान नकार देण्यात माहिर आहे असा टोलाही त्यांनी लगावला आहे. “मुंबई 26/11 दहशतवादी हल्ल्याशी संबंध त्यांनी नाकारला होता. या हल्ल्यात 170 लोक मारले गेले होते. पण जेव्हा दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात आलं आणि त्याने सांगितलेलं सर्व खरं असल्याचं सिद्ध झालं तेव्हा ते उघडे पडले. ओसामा बिन लादेन कुठे आहे हे माहित नाही असा दावाही त्यांनी केला होता. पण त्याला पाकिस्तानी लष्करी तळापासून जवळच लष्करी छावणीत पकडण्यात आलं. आम्हाला सतत पुरावे दाखवा अशाच भूमिकेत ते नेहमी असतात. वस्तुस्थिती अशी आहे की पुरेसे परिस्थितीजन्य पुरावे आहेत आणि गुप्तचर यंत्रणांकडून माहिती मिळाली आहे ज्याच्या आधारे भारत कारवाई करत आहे. असं करण्यामागे भारताकडे दुसरं कोणतंही कारण नाही,” असंही त्यांनी अल अरेबिया मुलाखतीदरम्यान सांगितले.
भारत शक्तिशाली देश असून, पाकिस्तानकडे असलेलं काही नको आहे असंही ते म्हणाले आहेत. “भारत आपली अर्थव्यवस्था मजबूत करण्यावर, तंत्रज्ञान सुधारण्यावर आणि आपल्या तरुणांना चांगलं भविष्य देण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. आम्हाला पाकिस्तानशी काही देणं घेणं नसून, पाकिस्तानला एकटं सोडायला तयार आहोत. पाकिस्तान भारताच्या ताब्यातील प्रदेशांवर दावा करतो. ती एक धर्मांध शक्ती आहे जी भारतातील काही भाग ताब्यात घेऊ इच्छिते कारण तेथे राहणारे लोक पाकिस्तानी लोकांसारखेच धर्माचे आहेत. पण 20 कोटी भारतीय मुस्लिम आहेत ज्यांचा धर्म पाकिस्तानी लोकांसारखाच आहे. त्यांना ते सर्व ताब्यात घ्यायचे आहे का? हा एक हास्यास्पद दृष्टिकोन आहे जो पाकिस्तानी स्वीकारत आहेत,” अशी टीकाही त्यांनी केली.
