सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीची (CCS) आज संध्याकाळी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. सीसीएसला 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची सविस्तर माहिती देण्यात आली, ज्यामध्ये 25 भारतीय आणि एक नेपाळी नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत. सीसीएसने या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आणि पीडितांच्या कुटुंबियांबद्दल तीव्र संवेदना व्यक्त केल्या आहेत. या बैठकीनंतर परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी पत्रकार परिषद घेत बैठकीतील निर्णयांची माहिती दिली. भारतात असणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना 48 तासात देश सोडण्याचे आदेश देण्यात आल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.
“पाकिस्तानी नागरिकांना SAARC व्हिसा सवलत योजनेअंतर्गत भारतात प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही. पाकिस्तानी नागरिकांना पूर्वी जारी केलेले कोणतेही SPES व्हिसा रद्द मानले जातील. सध्या SPES व्हिसाखाली भारतात असलेल्या कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाकडे भारत सोडण्यासाठी 48 तासांचा कालावधी आहे,” असं त्यांनी सांगितलं.
नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील संरक्षण, लष्करी, नौदल आणि हवाई सल्लागारांना Persona Non Grata म्हणजेच अस्विकार्य घोषित केलं आहे. त्यांच्याकडे भारत सोडण्यासाठी एक आठवडा आहे असंही त्यांनी सांगितलं. तसंच भारत इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयातील स्वतःचे संरक्षण, नौदल आणि हवाई सल्लागार काढून घेणार आहे. संबंधित उच्चायुक्तालयातील ही पदे रद्द मानली जातील असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
तसंच या दहशतवादी हल्ल्याचे गांभीर्य ओळखून, सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीने (CCS) 1960 चा सिंधू पाणी करार तात्काळ प्रभावाने स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत पाकिस्तान सीमापार दहशतवादाला पाठिंबा देणं रोखत नाही तोपर्यंत कारवाई केली जाईल असं विक्रम मिस्त्री यांनी सांगितलं आहे.
याशिवाय एकत्रित चेकपोस्ट अटारी तात्काळ बंद करण्यात येईल. वैध प्रमाणपत्रांसह ज्यांनी सीमा ओलांडली आहे ते 1 मे 2025 पूर्वी त्या मार्गाने परत जाऊ शकतात असं सांगण्यात आलं आहे.
