मुंबईतील विक्रोळी येथे एका विवाहित महिलेची हत्या करण्यात आल्याप्रकरणी 25 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. विक्रोळीत सोमवारी रात्री निवासस्थानी महिलेचा खून करण्यात आला. आरोपी हनाफा शाह याने 37 वर्षीय सुमन सुरजलालची तिच्याच निवासस्थानी धारदार शस्त्राने गळा कापून हत्या केली. पीडित महिला त्याला वारंवार लग्न करण्यास सांगत होती. याच संतापात त्याने तिची हत्या केली.
सुमन धारावी येथे एका चामड्याच्या पिशव्या बनवण्याच्या युनिटमध्ये काम करत होती. येथे काम करत असतानाच तिची ओळख धारावी येथे राहणाऱ्या शाहशी झाली. शाह अविवाहित होता. दोघांमध्ये मैत्री झाली आणि लवकरच त्यांचे प्रेमसंबंध सुरू झाले. सुमनचा नवरा सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. कामानिमित्त नवरा संध्याकाळी बाहेर पडल्यानंतर शाह तिच्या घरी जात असे.
सुमन आणि तिच्या पती दोघांनाही पहिल्या लग्नापासून मुले होती. पण मुलं त्यांच्यासोबत राहत नव्हती. गेल्या काही आठवड्यांपासून सुमनने शाहकडे तिच्याशी लग्न करण्यासाठी तगादा लावला होता. परंतु तो त्याला नकार देत होता. अखेर तिने त्याला अल्टिमेटम दिला आणि सोमवारी रात्री या मुद्द्यावरून त्यांच्यात जोरदार भांडण झालं.
अखेर शाहने संतापाच्या भरात तिला मारहाण केली. तिचे हातपाय बांधले आणि नंतर गळा कापला. हत्या केल्यानंतर शाहने घटनास्थळावरुन पळ काढला होता. पती सकाळी घरी पोहोचल्यानंतर हत्या झाल्याचं उघड झालं. पती घरी पोहोचला असता पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. यानंतर पतीने पोलिसांना कळवलं. पोलिसांनी घटनास्थळ गाठलं आणि हत्येचा गुन्हा दाखल केला.
त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. तसंच मृत महिलेचे मोबाईल फोन रेकॉर्ड तपासले ज्याच्या आधारे त्यांनी शाहचा माग काढण्यात आला आणि त्याला अटक केली.
