जालना जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. अतिवृष्टी, पूर आणि गारपिटीमुळे मोठं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनानं ज्या सानुग्रह अनुदानाची घोषणा केली होती, यातील मंजूर अनुदानातून जवळपास तब्बल 50 कोटी रुपये तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यकांनी हडप केल्याचा (Jalna Crime News) अंदाज आहे. दरम्यान हा किती कोटींचा अपहार आहे हे अद्याप निश्चित सांगता येत नाही, मात्र असा अपहार झाल्याची कबुली उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनी दिली आहे.
प्राथमिक चौकशीमध्येच धक्कादायक प्रकार समोर
तहसीलदारांचं लॉगिन आणि पासवर्ड वापरून अनुदान वितरणात हेराफेरी करण्याचा प्रकार समोर आलाय. शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून मतदान दिलेल्या सूचनेवरून जिल्हाधिकाऱ्यांनी याची चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, प्राथमिक चौकशीमध्येच हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एकाच शेतकऱ्याच्या नावावर वेगवेगळे VK नंबर तयार करून, तसेच जमीन किंवा फळबाग नसलेल्या शेतकऱ्यांच्या नावे अनधिकृतपणे अनुदान मंजूर केल्याचं या चौकशीत समोर येत आहे.
उपविभागीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्य समिती स्थापन
पुढे आलेल्या माहितीनुसार, 2022-2023 मध्ये झालेल्या अतिवृष्टी, पुर आणि गारपीटीमुळे जालना जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं होतं. 2022 आणि 23 साली अतिवृष्टीमुळे 1103 कोटी मंजूर झाले होते. त्यापैकी 983 कोटी वाटप झाले आहेत. या वाटप अनुदानातल्याच शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशांवरच काही अधिकाऱ्यांनी डल्ला मारल्याचं आता स्पष्ट होतंय. जिल्हा प्रशासनाने या घोटाळ्याची गुप्त चौकशी सुरू केली आहे. आतापर्यंत अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील 80 गावांची चौकशी पूर्ण झाली आहे. तर खबरदारी म्हणून जिल्ह्यातील इतर गावांची देखील तपासणी होणार असल्याची माहिती पुढे आली आहे. ही चौकशी पूर्ण झाल्यानंतर नेमके कोण-कोणते तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यात सामील आहेत, हे समोर येणार आहे. दरम्यान या चौकशी विषयी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनी अधिक माहिती देत असताना या सर्व प्रकरणावर भाष्य केलं आहे.
शेतकऱ्याचे स्मशानात चितेवर झोपून आंदोलन, सरसकट कर्जमाफीची मागणी
जालन्यात शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी एका शेतकऱ्याने स्मशानभूमीत चितेवर झोपून आंदोलन सुरू केलंय जालन्यातील बदनापूर तालुक्यातील केळीगव्हाण येथील स्मशानभूमीत कारभारी म्हसलेकर या शेतकऱ्याने हे आंदोलन सुरू केलंय,दरम्यान आंदोलकांने यमाचा(मृत्यू देवतेचा) फोटो समोर ठेवून तिरडीवर झोपून हे अनोखं अनोख आंदोलन सुरू केलंय .
