महाराष्ट्रातील विविध देवस्थळांमध्ये मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी जात असतात. दरम्यान अनेक देवस्थळांमध्ये भाविकांसाठी ड्रेसकोड लागू करण्यात आलाय. आता अष्टविनायक गणपतींसह 5 मंदिर व्यवस्थापनांकडून पोशाखाची नियमावली लागू करण्यात आली आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
अष्टविनायक गणपतींपैकी मोरगावचा मोरेश्वर, थेऊरचा चिंतामणी, सिद्धटेकचा सिद्धिविनायक यांसह चिंचवडचा मोरया गोसावी संजीवन मंदिर आणि खार नारंगी मंदिरातील दर्शनासाठी पोशाखाची नियमावली जाहीर करण्यात आलीये. ही 5 मंदिरे ज्या ट्रस्टच्या अंतर्गत येतात, त्या चिंचवड देवस्थान ट्रस्टकडून ही वस्त्रसंहिता लागू करण्यात आलीये.
देवस्थान ट्रस्टचं काय म्हणणं?
मंदिरांमध्ये पोशाष नियमावली लागू झाल्यानंतर भाविकांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येत असतात. दरम्यान मंदिर प्रशासनाने या ड्रेस कोड नियमांसंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. ‘ही सक्ती नाही तर मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी तोकडे कपडे परिधान करुन दर्शनासाठी न येण्याची विनंती करण्यात आलीय’, असं चिंचवड देवस्थान ट्रस्टचं म्हणणं आहे.
मंदिर प्रवेशासाठी पोशाखाची नियमावली
पुरुषांनी पारंपरिक आणि सभ्य पोशाख परिधान करावा. शर्ट, टी-शर्ट आणि पूर्ण पँट किंवा धोतर, कुर्ता पायजमा असा मंदिराच्या पवित्रतेला साजेसा पोशाख परिधान करावा. महिलांनी साडी, सलवार कमीज, पंजाबी ड्रेस किंवा अन्य पारंपरिक पोशाख परिधान करावा. मंदिराच्या पावित्र्यास अनुकूल असलेले आणि आदरयुक्त वस्त्र परिधान करावे. कोणीही अति आधुनिक, अपारंपरिक, पारदर्शक, टोकदार, स्लीव्हलेस, फाटके, शरीरप्रदर्शन करणारे अथवा अनौपचारिक कपडे मंदिर प्रांगणात परिधान करू नये.
