भारतातील लोकांची देवावर खूप श्रद्धा आहे. त्यामुळेच कोट्यवधी भक्त दर दिवशी देवाचं दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये जातात. देवाचं दर्शन घेतात. आपल्या मनातील इच्छा देवापुढे व्यक्त करतात, नवस करतात. ज्यांचा नवस पूर्ण होतो ते भक्त मंदिरात आपल्या इच्छेनुसार पैसे दान करतात. काहीजण दर्शन घेण्यासाठी जरी गेले तरी मंदिराच्या दानपेटीमध्ये आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार पैसे दान करतात. जेव्हा ही दान पेटी मंदिर प्रशासनाकडून उघडली जाते, तेव्हा त्या दानपेटीमधून लाखो रुपये मिळतात. या पैशांमधून अन्नदान केलं जातं, रुग्णालय चालवले जातात. गरीबांना मदत केली जाते, या सारखी अनेक विधायक कामं केली जातात. मात्र या दानपेटीवर एका बँक अधिकाऱ्यानेच डल्ला मारल्याचा विचित्र प्रकार समोर आला आहे.
नेमकं घडलं काय?
मथुरामध्ये असलेलं बांकेबिहारी मंदिर भाविकांची कायम गर्दी असणारं जगप्रसिद्ध आहे. देशभरातूनच नाही तर जगभरातून लोक इथे बांकेबिहारींचं दर्शन घेण्यासाठी येतात. या मंदिराला कोट्यवधी रुपयांची देणगी प्राप्त होते. दानपेटीमधून लाखो रुपये मिळतात. मार्च महिन्यामध्ये जेव्हा बांकेबिहारी यांची दानपेटी उघडण्यात आली तेव्हा तिथे अनेक बँक अधिकारी देखील पोहोचले. जेव्हा -जेव्हा दानपेटी उघडण्यात येते त्यातील पैशांची मोजणी ही 40 पेक्षा अधिक लोकांच्या समक्ष केली जाते. यावेळी देखील असंच झालं. मात्र यावेळी दान पेटीमधून तब्बल 9 लाख 78 हजार रुपये चोरी झाल्याची घटना समोर आली. जेव्हा मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज चेक केलं तेव्हा बँक अधिकारी अभिनव सक्सेना हा चोरी करताना दिसून आला, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
चोरी करताना रंगेहाथ पकडलं
घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, आरोपी अभिनव सक्सेना हा एक बँक अधिकारी आहे. तो गेल्या तीन दिवसांपासून पैशांची मोजणी करताना दान पेटीतील पैशांची चोरी करत होता. जेव्हा मंदिर प्रशासनातील काही लोकांनी त्याला चोरी करताना पाहिलं तेव्हा त्याची झडती घेण्यात आली. तेव्हा त्याच्या पँटमध्ये आणि अंडरवियरमध्ये त्यांना एक लाख 28 हजार रुपये सापडले. त्यांनी तातडीनं या घटनेची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
घरात सापडलं घबाड
पोलिसांनी अभिनव सक्सेनाला अटक केल्यानंतर त्याच्या घराची झडती घेतली. त्याच्या घराच्या कपाटामध्ये लाखो रुपये सापडले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून तो चोरी करत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच तीन दिवसांमध्ये या अधिकाऱ्याच्या खात्यावर लाखो रुपये जमा झाल्याचं तपासात समोर आलं आहे. आता या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
